कुंडली की  एलायझा ?

तशी जुनी गोष्ट, पण पक्की लक्षात राहिलेली.

रात्री एक वाजता फोन खणखणला. इमर्जन्सी काॅल असावा असे समजून फोन उचलला .पण बहुदा माझा अंदाज चुकला. माझ्या परिचयाच्या एका शिक्षक महोदयांचा  तो फोन होता.

“ डॉक्टर साहेब माफ करा. अत्यंत महत्त्वाचं काम असल्यानं इतक्या रात्री त्रास देतोय.”

“नो प्रॉब्लेम ,बोला.” मी किंचितही नाराज न होता प्रतिसाद दिला.

“थोडं सविस्तरच  सांगतो. गेल्या आठवड्यात माझ्या बहिणीचं लग्न ठरलं . मुलगा कराडचा. आम्ही पूर्वी कराडला होतो. ओळखीच्या गृहस्थानीच हे स्थळ काढलं. देणं घेणं जमलं. साखरपुडा झाला आणि उद्या सकाळी ११.३५ च्या मुहूर्तावर सांगलीतच लग्न आहे. डॉक्टर ,ऐकताय ना ?”

“ हो, हो, बोला.मी ऐकतोय.”

“ या लग्नाच्या गोष्टीतली माझी भूमिका अजून स्पष्ट झाली नव्हती. तुम्हाला अपरात्री फोन करायचं  कारण पुढे सांगतोच. तीन तासापूर्वी म्हणजे , रात्री दहा वाजता मला कराडहून फोन आला….नवरा मुलगा एच.आय.व्ही. पाॅझिटिव्ह असल्याची खात्रीशीर माहिती एकाने दिलीय. त्यावेळी पासून आम्ही घरचे सारे अस्वस्थ आहोत. काय करावे सुचेना. शेवटी धाडसाने मुलाकडून त्यांच्या फॅमिली डॉक्टरांचा नंबर मिळवला. त्यांना लगेच फोन लावला पण त्यानी या विषयी कानावर हात ठेवले. डॉक्टर, दहा तासांवर मुहूर्त आलाय. आता काय करावं याबद्दल तुम्हीच मार्गदर्शन करा.”

मी त्यांना आधार देत म्हणालो , “ काळजी करू नका. मन खंबीर ठेवा.मी सांगतो त्याप्रमाणं पुढची पाऊलं  उचला.”मी त्यांना प्लॅन सांगितला.

अपेक्षेप्रमाणे सकाळी सात वाजता त्या शिक्षकांचा फोन आला.

“डॉक्टर, आपण सांगितल्याप्रमाणे  मध्यस्थी गृहस्थांना  आम्ही एच.आय.व्ही. चाचणी झाल्याशिवाय अक्षता पडणार नाहीत असे ठणकावून सांगितले आहे.”

मी समाधान व्यक्त करून वाटल्यास पुन्हा संपर्क साधण्यास सांगितले .

सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या हॉस्पिटलमध्ये आठ-दहा लोकांचा घोळका शिरला. ती कराडची वऱ्हाडी  मंडळी होती. अर्थातच त्यात या शिक्षक महोदयांचा समावेश होताच.

मी हसतमुखाने सर्वांचं स्वागत करून अत्यंत मृदू शैलीत त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली,

“ कुणीतरी बहुधा खोडसाळपणा केलेला दिसतो. वराला एडसचा संसर्ग झालाय असं वधू पक्षाला सांगण्यात आलेलं आहे . कृपया गैरसमज करून घेऊन नका. समजा तुमच्या बहिणीचं लग्न असतं, आणि ही वेळ तुमच्या बहिणीवर आली असती, तर काय झालं असतं ? याचा विचार करा आणि मनात किंतु न ठेवता एच.आय.व्ही. चाचणीस तयार व्हा.”

माझ्या या आवाहनास सुदैवाने वरपक्ष तयार झाला.

मुलाला तातडीने पॅथालॉजिस्टकडे धाडले.

( निगेटिव्ह ) रिपोर्टनंतर  अक्षता पडतील, असे समजुतीने सांगून सर्वाना लग्न मंडपात पाठविले.

अर्ध्या तासात रिपोर्ट समजला. नवरा मुलगा पॉझिटिव्ह म्हणजे एड्सबाधित होता. अर्थातच तो विवाह होऊ शकला नाही. वऱ्हाडी  मंडळी अक्षता शिवाय परतली.

सायंकाळी सहा वाजता ते शिक्षक आपल्या बहिणी समवेत आले. कृतज्ञतेने म्हणाले, “डॉक्टर, तुमच्यामुळे एच.आय.व्ही रिपोर्ट मागण्याचे धाडस आम्ही करू शकलो.”

त्यांनी फुलांचा गुच्छ आणि मिठाईचा एक बॉक्स माझ्या हाती दिला.

आजपर्यंत विवाह ठरल्याची मिठाई मी चाखली होती. विवाह मोडल्याचा आनंद (?)आणि मिठाई मी प्रथमच स्वीकारत होतो.

भारतात एडसचा शिरकाव होऊन जवळपास एकतीस वर्षे लोटलीत . एड्स विषयीचे प्रबोधन अनेक प्रसार माध्यमातून सातत्याने झाले आहे. पण  विवाहाच्या बाबतीत आपण अजूनही मागासलेलो आहोत. अनेक विवाहांच्या बाबतीत, विवाहपूर्वीच्या बोलणीत प्रत्यक्ष विवाह करणाऱ्या दोन जीवांचा सहभाग अत्यल्प असतो. शहरी भागात समाधान व्यक्त करण्यासारखी परिस्थिती असली तरी ग्रामीण भागात आजही ‘यादी पे शादी’ चे समारंभ होताना आढळतात. विवाहोत्सवावर होणारा वारेमाप खर्च टाळणे हा एकमेव फायदा सोडला तर ‘यादी पे शादी’ चे  तोटेच तोटे आहेत. विवाहानंतर दोन व्यक्ती आयुष्यभर एकमेकांना साथ करत असतात, पण कोणत्या दोन व्यक्तींनी विवाह करायचा, याचा निर्णय मात्र एक-दोन दिवसात झटपट उरकला जातो.

मुलगी शिकली, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट झाली तरी, वर निवडताना मात्र घरातले करते सवरतेच पुढे असतात. वर वधूच्या शैक्षणिक पात्रतेबरोबर त्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव भविष्यातील ध्येये, कौटुंबिक वातावरण, संस्कार, व्यसनाधीनता या गोष्टीचा सारासार विचार होऊन वेळप्रसंगी त्यांची शहानिशा होऊन विवाह जुळायला नि जुळवायला हवेत.

Screen Shot 2017-12-01 at 11.11.35 PM

एड्स हा एक दीर्घकालीन त्रासदायक रोग म्हणून गणला जातो. आज त्यावर अनेक औषधे उपलब्ध आहेत.आज उपलब्ध असलेल्या औषधांमुळे रुग्णाचे आयुष्य वाढू शकते.रोग पूर्ण बरा होत नाही. अशा वातावरणात एच.आय.व्ही.बाधित तरुणाचे विवाह धुमधडाक्यात लावून देण्याचे प्रकार आजही काही ठिकाणी होतात.अशा तरुणांशी विवाह करणाऱ्या तरुणीला एड्सची बाधा होणार हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे. असे असताना विवाहापूर्वी कुंडलीची मागणी न करता एलायझा- एच. आय. व्ही चाचणीची मागणी करणे ही काळाची गरज आहे. आपण बाजारात पुस्तक खरेदी करायला गेलो तर कोणते प्रकाशन, कोणती आवृत्ती याची चौकशी करतो. कपडे खरेदी करताना त्याचा ब्रँड पाहतो. एक-दोन दुकाने पालथी घालतो वहाणा खरेदी करताना नेमके माप बघतो, कंपनी बघतो. परीक्षेत नापास झालो तरी मार्चनंतर ऑक्टोबरला पुन्हा परीक्षेची संधी असते.

विवाह म्हणजे पुस्तक नव्हे, कपडे नव्हेत, वहाणा नव्हेत की परीक्षा नव्हे.

या प्रत्येक बाबतीत आपण केवळ जागरूक नव्हे तर चोखंदळ असतो, मग विवाहाच्या बाबतीत का नको?

१ डिसेंबर या ‘जागतिक एड्सविरोधी दिना ‘निमित्त  सर्व विवाहेच्छू युवक- युवतींना आणि तमाम पालकांना एवढेच सांगावेसे वाटते की, एडसबाधित व्यक्तींशी विवाह करून ‘निर्दोष बळी’ ठरण्यापेक्षा विवाहापूर्वी एच.आय.व्ही -एलायझा चाचणीचा आग्रह धरा.

आपल्या आरोग्यासाठी…

हा ब्लाॅग आपल्यासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. 

आजच्या धकाधकीच्या – धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याविषयी जागरूक झालो आहोत असे म्हणतो , पण ते पूर्णपणे खरे नाही .

आपल्यापैकी कुणाकडे मोटारसायकल असते , सायकल असते , कुणाकडे जीप तर कुणाकडे कार असते. मोटरसायकल किंवा कार कुरकुर करायला लागते , तेंव्हा आपण तातडीने मिस्त्री -मेकॅनिक किंवा सर्व्हिसिंग सेंटर गाठतो ,पण जेंव्हा स्वतःला काही त्रास होऊ लागतो , तेंव्हा लगेच डाॅक्टरकडे जात नाही. दैनंदिन घडामोडीशी ,खाण्यापिण्याशी , नुकत्या झालेल्या श्रमाशी -अतिश्रमाशी किंवा प्रवासाशी त्याची सांगड घालतो . बऱ्याचदा स्वतः कडील अथवा औषध दुकानातील औषधे -गोळ्या घेऊन वेळ मारून नेतो. एवढे करुन त्रास कमी झाला नाही तर मग डॉक्टरकडे  जातो. कदाचित अशा वेळी उशीर झालेला असतो.काट्याचा नायटा झालेला असतो . दुखणं हाताबाहेर गेलेलं असतं . तपासणीनंतर मात्र डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे जीवनशैलीतील बदल , औषधोपचार , आहार , व्यायाम ,विश्रांती या सर्व गोष्टी आपण अंमलात आणतो. याचाच अर्थ ,आपल्याला काही आजार झाला आहे ,हे समजल्यानंतरच आपले डोळे उघडतात .

आज वैद्यकशास्त्रात प्रचंड क्रांती झाली आहे .गेल्या वीस शतकातील वैद्यक संशोधनाचा वेग अलीकडच्या वीस-तीस वर्षात अनेक  पटीने वाढला आहे .नवनवीन अचूक आणि वेगवान निदान पध्दती , नेमकी औषधे , अत्याधुनिक उपचाराची साधने , वेदनारहित शस्त्रक्रिया आज जिल्हा आणि काही अंशी तालुका पातळीवर उपलब्ध झाले आहेत. वैद्यक साधनसुविधा आपल्यापर्यंत पोहोचल्या , याचा अर्थ ‘आरोग्य’ पोहोचले असे होत नाही . ही आधुनिक साधने किंवा उपचारपद्धती व्यक्तीची रोगापासून पूर्णतः किंवा अंशतः सुटका करू शकतात पण ती त्याला आरोग्य देऊ शकत नाहीत.

‘ शारिरीक ,मानसिक ,सामाजिक आणि आत्मिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य ‘ ही जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची केलेली व्याख्या आहे . असे ‘आरोग्य ‘ समाजाला लाभावे यासाठी डाॅक्टर प्रयत्नशील असतात . पण ही जबाबदारी केवळ डॉक्टरचे नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाचे असते . डॉक्टर हा शब्द डॉसियर या लॅटिन शब्दावरून आला आहे .डॉसियर या शब्दाचा अर्थ ‘ To Teach ‘ म्हणजे ‘ शिकविणे किंवा मार्गदर्शन करणे ‘ असा होतो म्हणूनच रुग्णाला व्याधीमुक्त करण्याबरोबर त्याला आणि सर्व समाजाला मार्गदर्शन करणे, हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य असते.

आज एकविसाव्या शतकात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या ,रहदारी , कारखाने त्यातून निर्माण होणारे प्रदूषण ,इन्स्टंट किंवा हवाबंद डब्यातील खाणे-पिणे , भौतिक सुखांनी वेढलेल्या आयुष्यातील बैठे काम , व्यायामाचा अभाव, जीवघेण्या स्पर्धेतील ताणतणाव , नवनवीन प्रकारचे जंतुसंसर्ग , सामाजिक विषमता , गुन्हेगारी – हिंसा , त्यातून येणारी विषण्णता , नव्या पिढीसमोरील बेकारी – भ्रष्टाचार – बेजवाबदार नेतृत्वासारखे प्रश्न ,व्यसनाधीनता ,पाश्च्यात्यांचे अंधानुकरण आणि भारतीय जीवनशैलीचा वेगाने पडणारा विसर यामुळे शरीरस्वास्थ्य तर बिघडतेच पण मन:स्वास्थ्य देखील हरवून जाते .

आपल्याकडची सायकल  असो वा कार आपण ती बाजारातून पैसे देऊन विकत आणलेली असते , म्हणून त्याची किंमत आपल्याला ठाऊक असते .पण शरीर किंवा आरोग्य मिळवण्यासाठी आपण कुठे पैसे दिलेले नसतात , त्यामळे त्याची किंमत आपल्याला कळत नाही . आपले शरीर आपले ओरोग्य ही एक अनमोल संपती आहे                                            

पुनवित्तं ,पुनर्मित्रं ,पुनर्भाया , पुनर्मही

एत एवं पुनर्लभ्यते , न शरीरं पुनः पुनः

अर्थ : गेलेली संपत्ती परत मिळू शकते , दुरावलेला मित्र पुन्हा मिळू शकतो , पत्नी दुरावली असेल तर तिलाही आपण विनवण्या करुन आणू शकतो एवढेच नव्हे तर हातून गेलेले राज्यदेखील पराक्रम करुन पुन्हा मिळविता येते .या सर्व गोष्टी पुन्हा परत मिळू शकतात पण एकदा मिळालेलं शरीर जर बिघडलं तर ते जसं च्या तसं पुन्हा मिळू शकत नाही . थोडक्यात गमावलेलं आरोग्य पुन्हा परत लाभत नाही. म्हणून, आपल्या शरीराची , आरोग्याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे . तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण डॉक्टरांकडे जाणाऱ्या लोकांपैकी जेमतेम १० टक्के लोकांना औषधाची गरज असते . ९० टक्के लोकांना गरज असते ती मानसिक आणि सामाजिक स्वास्थाची . जगावे कसे ? या उत्तराची . नेमके हेच आम्ही या ब्लाॅग द्वारे करणार आहोत .

‘ Prevention is better than Cure ‘- ‘ रोग झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ न देणे बरे ‘ ही उक्ती सार्थ करण्यासाठी आपल्याला या ब्लॉगवर आरोग्याविषयी खूप काही वाचायला मिळेल .

तर मग आता नियमितपणे वाचा…आपल्या आरोग्यासाठी !!!

आरोग्यदायी शुभेच्छांसह !!

डॉ . अनिल मडके