हा ब्लाॅग आपल्यासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. 

आजच्या धकाधकीच्या – धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याविषयी जागरूक झालो आहोत असे म्हणतो , पण ते पूर्णपणे खरे नाही .

आपल्यापैकी कुणाकडे मोटारसायकल असते , सायकल असते , कुणाकडे जीप तर कुणाकडे कार असते. मोटरसायकल किंवा कार कुरकुर करायला लागते , तेंव्हा आपण तातडीने मिस्त्री -मेकॅनिक किंवा सर्व्हिसिंग सेंटर गाठतो ,पण जेंव्हा स्वतःला काही त्रास होऊ लागतो , तेंव्हा लगेच डाॅक्टरकडे जात नाही. दैनंदिन घडामोडीशी ,खाण्यापिण्याशी , नुकत्या झालेल्या श्रमाशी -अतिश्रमाशी किंवा प्रवासाशी त्याची सांगड घालतो . बऱ्याचदा स्वतः कडील अथवा औषध दुकानातील औषधे -गोळ्या घेऊन वेळ मारून नेतो. एवढे करुन त्रास कमी झाला नाही तर मग डॉक्टरकडे  जातो. कदाचित अशा वेळी उशीर झालेला असतो.काट्याचा नायटा झालेला असतो . दुखणं हाताबाहेर गेलेलं असतं . तपासणीनंतर मात्र डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे जीवनशैलीतील बदल , औषधोपचार , आहार , व्यायाम ,विश्रांती या सर्व गोष्टी आपण अंमलात आणतो. याचाच अर्थ ,आपल्याला काही आजार झाला आहे ,हे समजल्यानंतरच आपले डोळे उघडतात .

आज वैद्यकशास्त्रात प्रचंड क्रांती झाली आहे .गेल्या वीस शतकातील वैद्यक संशोधनाचा वेग अलीकडच्या वीस-तीस वर्षात अनेक  पटीने वाढला आहे .नवनवीन अचूक आणि वेगवान निदान पध्दती , नेमकी औषधे , अत्याधुनिक उपचाराची साधने , वेदनारहित शस्त्रक्रिया आज जिल्हा आणि काही अंशी तालुका पातळीवर उपलब्ध झाले आहेत. वैद्यक साधनसुविधा आपल्यापर्यंत पोहोचल्या , याचा अर्थ ‘आरोग्य’ पोहोचले असे होत नाही . ही आधुनिक साधने किंवा उपचारपद्धती व्यक्तीची रोगापासून पूर्णतः किंवा अंशतः सुटका करू शकतात पण ती त्याला आरोग्य देऊ शकत नाहीत.

‘ शारिरीक ,मानसिक ,सामाजिक आणि आत्मिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य ‘ ही जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची केलेली व्याख्या आहे . असे ‘आरोग्य ‘ समाजाला लाभावे यासाठी डाॅक्टर प्रयत्नशील असतात . पण ही जबाबदारी केवळ डॉक्टरचे नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाचे असते . डॉक्टर हा शब्द डॉसियर या लॅटिन शब्दावरून आला आहे .डॉसियर या शब्दाचा अर्थ ‘ To Teach ‘ म्हणजे ‘ शिकविणे किंवा मार्गदर्शन करणे ‘ असा होतो म्हणूनच रुग्णाला व्याधीमुक्त करण्याबरोबर त्याला आणि सर्व समाजाला मार्गदर्शन करणे, हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य असते.

आज एकविसाव्या शतकात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या ,रहदारी , कारखाने त्यातून निर्माण होणारे प्रदूषण ,इन्स्टंट किंवा हवाबंद डब्यातील खाणे-पिणे , भौतिक सुखांनी वेढलेल्या आयुष्यातील बैठे काम , व्यायामाचा अभाव, जीवघेण्या स्पर्धेतील ताणतणाव , नवनवीन प्रकारचे जंतुसंसर्ग , सामाजिक विषमता , गुन्हेगारी – हिंसा , त्यातून येणारी विषण्णता , नव्या पिढीसमोरील बेकारी – भ्रष्टाचार – बेजवाबदार नेतृत्वासारखे प्रश्न ,व्यसनाधीनता ,पाश्च्यात्यांचे अंधानुकरण आणि भारतीय जीवनशैलीचा वेगाने पडणारा विसर यामुळे शरीरस्वास्थ्य तर बिघडतेच पण मन:स्वास्थ्य देखील हरवून जाते .

आपल्याकडची सायकल  असो वा कार आपण ती बाजारातून पैसे देऊन विकत आणलेली असते , म्हणून त्याची किंमत आपल्याला ठाऊक असते .पण शरीर किंवा आरोग्य मिळवण्यासाठी आपण कुठे पैसे दिलेले नसतात , त्यामळे त्याची किंमत आपल्याला कळत नाही . आपले शरीर आपले ओरोग्य ही एक अनमोल संपती आहे                                            

पुनवित्तं ,पुनर्मित्रं ,पुनर्भाया , पुनर्मही

एत एवं पुनर्लभ्यते , न शरीरं पुनः पुनः

अर्थ : गेलेली संपत्ती परत मिळू शकते , दुरावलेला मित्र पुन्हा मिळू शकतो , पत्नी दुरावली असेल तर तिलाही आपण विनवण्या करुन आणू शकतो एवढेच नव्हे तर हातून गेलेले राज्यदेखील पराक्रम करुन पुन्हा मिळविता येते .या सर्व गोष्टी पुन्हा परत मिळू शकतात पण एकदा मिळालेलं शरीर जर बिघडलं तर ते जसं च्या तसं पुन्हा मिळू शकत नाही . थोडक्यात गमावलेलं आरोग्य पुन्हा परत लाभत नाही. म्हणून, आपल्या शरीराची , आरोग्याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे . तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण डॉक्टरांकडे जाणाऱ्या लोकांपैकी जेमतेम १० टक्के लोकांना औषधाची गरज असते . ९० टक्के लोकांना गरज असते ती मानसिक आणि सामाजिक स्वास्थाची . जगावे कसे ? या उत्तराची . नेमके हेच आम्ही या ब्लाॅग द्वारे करणार आहोत .

‘ Prevention is better than Cure ‘- ‘ रोग झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ न देणे बरे ‘ ही उक्ती सार्थ करण्यासाठी आपल्याला या ब्लॉगवर आरोग्याविषयी खूप काही वाचायला मिळेल .

तर मग आता नियमितपणे वाचा…आपल्या आरोग्यासाठी !!!

आरोग्यदायी शुभेच्छांसह !!

डॉ . अनिल मडके

48 thoughts on “आपल्या आरोग्यासाठी…

  1. वा,छान
   जनस्वास्थासाठीची
   तूमची उर्मी
   अभिनंदनीय
   आरोग्य जागृती,
   निरोगी समाज
   आणि
   पर्यावरण रक्षण

   शिक्षण
   आज अंत्यत महत्वाचे आहे.
   नव्या उपक्रमाला शुभेच्छा !

   1. मन:पूर्वक धन्यवाद !!
    आपल्या शुभेच्छांचे बळ सदैव पाठीशी राहो !!!
    🙏🏻

 1. आपल्या या नव्या जनस्वास्थ्य चळवळीस हार्दिक शुभेच्छा!

 2. सर, खूप छान…
  आपल्यासारख्या समाजहितैषि वैध्दिक तज्ञाचा हा ब्लॉग समाजाला निश्चित दिशादर्शक ठरेल…

  पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा…

 3. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सर्वांपर्यंत खूप उपयुक्त माहिती पोहचवत आहात.
  Thanks.doc.
  👍👍

 4. आरोग्य बिघडू नये यासाठी योग्यवेळी मेन्टेनन्स करा…हा आपला संदेश मोलाचा-शेखर जोशी, सहयोगी संपादक ‘सकाळ’

  1. Yess. हार्दिक धन्यवाद !!!
   आपल्या शुभेच्छा सदैव सोबत राहोत , ही सदिच्छा !!!
   🙏🏻

 5. Dr. Anil Madake Heartiest Congratulations & best wishes for your new project & social work.

 6. सर जी खुपच छान…
  आपल्या आरोग्यासाठी…..
  हा ब्लॉग खुपच छान आहे.
  आज पर्यंत चे आपले कार्य सर्व सामान्य रुग्णांसाठी एक संजीवनी आहे.
  सामाजिक भान ठेवून आपण सुरू ठेवलेलं हे व्रत आमच्या सारख्या साठी प्रेरणा दायी आहे.
  आपल्या या अनमोल कार्याला आमच्या श्री साई मेडीकल फौंडेशन चा मानाचा मुजरा…….

  डॉ प्रविण कोळी
  संजीवनी हॉस्पिटल (जनरल, मँटर्निटी & सर्जिकल)
  बावची, सांगली

 7. Nice initiative. Best wishes to achieve the milestone in this exciting initiative.

 8. Very nice initiative of health related blog . Thanks for sharing such a useful information. Wishing you all the best..

 9. लोक आळशी किंवा निष्काळजी असतात असे नाही फक्त त्यांना शरीराच्या त्रासाच्या कुठल्या क्षणी डॉ कडे जायला हवे हे ठरवणे अनेक कोटुंबिक,आर्थिक कारणांनी अवघड असते उठसूट डॉ कडे जाणे शक्य नसतं व परवणारे ही असत नाही.अनेकांना पैशा अभावी डॉ चा विचारही करता येत नाही. औषधाच्या प्रचंड किमती, विविध तपासण्यांचा खर्च अगोदर डोळ्यापुढे उभा रहातो आणि मनात असूनही, दुखण्याकडे दुर्लक्ष होते.आता सरकारने इन्शुरन्स योजना आणली पाहिजे तरच तुम्ही निर्माण करत असलेल्या ,अत्यन्त स्तुत्य ,शरीरस्वास्थ्याची जाणीव आणि उपाय समाजातल्या प्रत्येक घटका पर्यंतपोहोचतील.तुम्हाला वाटणाऱ्या तळमळी साठी तुमचे कवतुक करावे तेव्हढे थोडे. ही एक मोठी समाज जागृतीची चळवळ ठरो . आपणास खूप खूप शुभेच्छा !

  1. शरीरस्वास्थ्य हा एक वेगळाच विषय आहे. ‘आहे रे’आणि ‘नाही रे’ किंवा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ हा फरक आरोग्यसेवेच्या क्षेत्रात ठळकपणे जाणवतो. त्याबद्दल सविस्तर पुन्हा कधीतरी !!
   प्रतिक्रिया, कौतुक आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद !!!

Leave a Reply