कुंडली की  एलायझा ?

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

कुंडली की  एलायझा ?

तशी जुनी गोष्ट, पण पक्की लक्षात राहिलेली.

रात्री एक वाजता फोन खणखणला. इमर्जन्सी काॅल असावा असे समजून फोन उचलला .पण बहुदा माझा अंदाज चुकला. माझ्या परिचयाच्या एका शिक्षक महोदयांचा  तो फोन होता.

“ डॉक्टर साहेब माफ करा. अत्यंत महत्त्वाचं काम असल्यानं इतक्या रात्री त्रास देतोय.”

“नो प्रॉब्लेम ,बोला.” मी किंचितही नाराज न होता प्रतिसाद दिला.

“थोडं सविस्तरच  सांगतो. गेल्या आठवड्यात माझ्या बहिणीचं लग्न ठरलं . मुलगा कराडचा. आम्ही पूर्वी कराडला होतो. ओळखीच्या गृहस्थानीच हे स्थळ काढलं. देणं घेणं जमलं. साखरपुडा झाला आणि उद्या सकाळी ११.३५ च्या मुहूर्तावर सांगलीतच लग्न आहे. डॉक्टर ,ऐकताय ना ?”

“ हो, हो, बोला.मी ऐकतोय.”

“ या लग्नाच्या गोष्टीतली माझी भूमिका अजून स्पष्ट झाली नव्हती. तुम्हाला अपरात्री फोन करायचं  कारण पुढे सांगतोच. तीन तासापूर्वी म्हणजे , रात्री दहा वाजता मला कराडहून फोन आला….नवरा मुलगा एच.आय.व्ही. पाॅझिटिव्ह असल्याची खात्रीशीर माहिती एकाने दिलीय. त्यावेळी पासून आम्ही घरचे सारे अस्वस्थ आहोत. काय करावे सुचेना. शेवटी धाडसाने मुलाकडून त्यांच्या फॅमिली डॉक्टरांचा नंबर मिळवला. त्यांना लगेच फोन लावला पण त्यानी या विषयी कानावर हात ठेवले. डॉक्टर, दहा तासांवर मुहूर्त आलाय. आता काय करावं याबद्दल तुम्हीच मार्गदर्शन करा.”

मी त्यांना आधार देत म्हणालो , “ काळजी करू नका. मन खंबीर ठेवा.मी सांगतो त्याप्रमाणं पुढची पाऊलं  उचला.”मी त्यांना प्लॅन सांगितला.

अपेक्षेप्रमाणे सकाळी सात वाजता त्या शिक्षकांचा फोन आला.

“डॉक्टर, आपण सांगितल्याप्रमाणे  मध्यस्थी गृहस्थांना  आम्ही एच.आय.व्ही. चाचणी झाल्याशिवाय अक्षता पडणार नाहीत असे ठणकावून सांगितले आहे.”

मी समाधान व्यक्त करून वाटल्यास पुन्हा संपर्क साधण्यास सांगितले .

सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या हॉस्पिटलमध्ये आठ-दहा लोकांचा घोळका शिरला. ती कराडची वऱ्हाडी  मंडळी होती. अर्थातच त्यात या शिक्षक महोदयांचा समावेश होताच.

मी हसतमुखाने सर्वांचं स्वागत करून अत्यंत मृदू शैलीत त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली,

“ कुणीतरी बहुधा खोडसाळपणा केलेला दिसतो. वराला एडसचा संसर्ग झालाय असं वधू पक्षाला सांगण्यात आलेलं आहे . कृपया गैरसमज करून घेऊन नका. समजा तुमच्या बहिणीचं लग्न असतं, आणि ही वेळ तुमच्या बहिणीवर आली असती, तर काय झालं असतं ? याचा विचार करा आणि मनात किंतु न ठेवता एच.आय.व्ही. चाचणीस तयार व्हा.”

माझ्या या आवाहनास सुदैवाने वरपक्ष तयार झाला.

मुलाला तातडीने पॅथालॉजिस्टकडे धाडले.

( निगेटिव्ह ) रिपोर्टनंतर  अक्षता पडतील, असे समजुतीने सांगून सर्वाना लग्न मंडपात पाठविले.

अर्ध्या तासात रिपोर्ट समजला. नवरा मुलगा पॉझिटिव्ह म्हणजे एड्सबाधित होता. अर्थातच तो विवाह होऊ शकला नाही. वऱ्हाडी  मंडळी अक्षता शिवाय परतली.

सायंकाळी सहा वाजता ते शिक्षक आपल्या बहिणी समवेत आले. कृतज्ञतेने म्हणाले, “डॉक्टर, तुमच्यामुळे एच.आय.व्ही रिपोर्ट मागण्याचे धाडस आम्ही करू शकलो.”

त्यांनी फुलांचा गुच्छ आणि मिठाईचा एक बॉक्स माझ्या हाती दिला.

आजपर्यंत विवाह ठरल्याची मिठाई मी चाखली होती. विवाह मोडल्याचा आनंद (?)आणि मिठाई मी प्रथमच स्वीकारत होतो.

भारतात एडसचा शिरकाव होऊन जवळपास एकतीस वर्षे लोटलीत . एड्स विषयीचे प्रबोधन अनेक प्रसार माध्यमातून सातत्याने झाले आहे. पण  विवाहाच्या बाबतीत आपण अजूनही मागासलेलो आहोत. अनेक विवाहांच्या बाबतीत, विवाहपूर्वीच्या बोलणीत प्रत्यक्ष विवाह करणाऱ्या दोन जीवांचा सहभाग अत्यल्प असतो. शहरी भागात समाधान व्यक्त करण्यासारखी परिस्थिती असली तरी ग्रामीण भागात आजही ‘यादी पे शादी’ चे समारंभ होताना आढळतात. विवाहोत्सवावर होणारा वारेमाप खर्च टाळणे हा एकमेव फायदा सोडला तर ‘यादी पे शादी’ चे  तोटेच तोटे आहेत. विवाहानंतर दोन व्यक्ती आयुष्यभर एकमेकांना साथ करत असतात, पण कोणत्या दोन व्यक्तींनी विवाह करायचा, याचा निर्णय मात्र एक-दोन दिवसात झटपट उरकला जातो.

मुलगी शिकली, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट झाली तरी, वर निवडताना मात्र घरातले करते सवरतेच पुढे असतात. वर वधूच्या शैक्षणिक पात्रतेबरोबर त्यांच्या आवडीनिवडी, स्वभाव भविष्यातील ध्येये, कौटुंबिक वातावरण, संस्कार, व्यसनाधीनता या गोष्टीचा सारासार विचार होऊन वेळप्रसंगी त्यांची शहानिशा होऊन विवाह जुळायला नि जुळवायला हवेत.

Screen Shot 2017-12-01 at 11.11.35 PM

एड्स हा एक दीर्घकालीन त्रासदायक रोग म्हणून गणला जातो. आज त्यावर अनेक औषधे उपलब्ध आहेत.आज उपलब्ध असलेल्या औषधांमुळे रुग्णाचे आयुष्य वाढू शकते.रोग पूर्ण बरा होत नाही. अशा वातावरणात एच.आय.व्ही.बाधित तरुणाचे विवाह धुमधडाक्यात लावून देण्याचे प्रकार आजही काही ठिकाणी होतात.अशा तरुणांशी विवाह करणाऱ्या तरुणीला एड्सची बाधा होणार हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे. असे असताना विवाहापूर्वी कुंडलीची मागणी न करता एलायझा- एच. आय. व्ही चाचणीची मागणी करणे ही काळाची गरज आहे. आपण बाजारात पुस्तक खरेदी करायला गेलो तर कोणते प्रकाशन, कोणती आवृत्ती याची चौकशी करतो. कपडे खरेदी करताना त्याचा ब्रँड पाहतो. एक-दोन दुकाने पालथी घालतो वहाणा खरेदी करताना नेमके माप बघतो, कंपनी बघतो. परीक्षेत नापास झालो तरी मार्चनंतर ऑक्टोबरला पुन्हा परीक्षेची संधी असते.

विवाह म्हणजे पुस्तक नव्हे, कपडे नव्हेत, वहाणा नव्हेत की परीक्षा नव्हे.

या प्रत्येक बाबतीत आपण केवळ जागरूक नव्हे तर चोखंदळ असतो, मग विवाहाच्या बाबतीत का नको?

१ डिसेंबर या ‘जागतिक एड्सविरोधी दिना ‘निमित्त  सर्व विवाहेच्छू युवक- युवतींना आणि तमाम पालकांना एवढेच सांगावेसे वाटते की, एडसबाधित व्यक्तींशी विवाह करून ‘निर्दोष बळी’ ठरण्यापेक्षा विवाहापूर्वी एच.आय.व्ही -एलायझा चाचणीचा आग्रह धरा.

34 Responses

 1. Smita patil says:

  सर,तुम्ही तुमच्या लेखाद्वारे सामाजिक प्रबोधनाचे काम करीत आहात.हे काम असंच पुढे सुरू राहो,ही शुभेच्या🌹.लेख खुपच आवडला.

 2. Milind Joshi says:

  Great sir
  You saved so many lives with only a stoke

 3. Yashvant Suryawanshi Retd Sr Supdt. Of post Sangli says:

  Dr. Anijl very good morning Lot of thanks for creating awareness about Health. It is fact that most of general and evevn ed ucated youngester have negative appeoch on this score. Your hard and sincere efforts will certainely bring positive results.= wish u very long healthy life== Suryavanshi Satara

 4. विठ्ठल मोहिते says:

  विवाह मोडल्याची मिठाई चाखल्याचा आनंद
  आम्हांसही आहे. एक सत्कर्म… !

 5. Anand Chivate says:

  Nice Sir….

 6. Ashok k jakune says:

  Very nice sir 👍🙏

 7. Ashok k jakune says:

  Very nice sir👍

 8. Rani yadav says:

  छान लिहिलंय सर ..लोकांची मानसिकता बदलायला हवी

 9. Varsha patil says:

  Great sir

 10. अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी ब्लॉग!
  समाजाला प्रबोधनाची खूपच गरज आहे. खरं तर तुमचे हे प्रबोधन सर्वसामान्य जनतेत नेण्याची आवश्यकता असून, ते आम्हासारख्यांना शक्य तेवढे करावे लागेल.
  सर तुम्हास धन्यवाद!

  • धन्यवाद !!
   समाज जागृतीसाठी, आरोग्यभान जपण्यासाठी आपण हा blog आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवून समाजकार्य करत आहात.
   आपल्यासारख्या जागरूक व्यक्तींचे काम मोलाचे आहे.
   या कार्यात आपले मनापासून स्वागत !!

 11. Dr Alka Gosavi says:

  खूप छान लिहीले आहे. अभिनंदन!

 12. Adv .Santosh v Kore says:

  Sir , Namaskar
  Tumcha lekh vachla
  Khup ch awadla
  Sir tumhi samaj prabhodhanach kam he Uttam karta
  🙏Dhanyavad sir

 13. प्रसाद केळकर says:

  लेख छानच झाला आहे. पण कुंडली न मागता एच आय व्ही एलायझा मागावी या वाक्याऐवजी कुंडलीबरोबर एचआयव्ही एलायझा पण मागावी. अस वाक्य अधिक चांगले झाले असते. कारण कुंडलीविषयी जागृती हा लेखाचा विषय नाही. व समाजात सगळे बदल एकदम होत नाहीत. बाकी छान आणि गरजेचे.

  • कुंडली पाहावी की न पाहावी, हा प्रस्तुत लेखाचा विषय नक्कीच नाही. आजच्या विज्ञानयुगात ‘कुंडली की एलायझा ?’ हेच शीर्षक समर्पक वाटते.
   प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !

 14. Dr.Supriya. Yadav. KARAD says:

  Congratulations Dr.Anil for saving life of that bride. Now need to check HIV staus of both partners in this leaving in relationship era. Hope that mentality of peoples will change. Great job you are doing. God bless you !!!

 15. डॉ. संतोष माने says:

  सर
  अतिशय उत्तम प्रबोधनात्मक लेख वाचायला मिळाला.
  धन्यवाद.
  अचूक व योग्य निर्णय घेतल्याने जीवन सुखकारक बनते.विज्ञान युगात वावरत असताना उघडा डोळे बघा निट या प्रमाणे प्रत्येकाने कार्यरत राहिले पाहिजे. आदरणीय सर आपण जे सामाजिक कार्य करतात त्यामुळे अनेकाचे जीवन फुलले आहेत.
  आपणास व आपल्या अव्दित्तीय सामाजिक कार्यास मानाचा मुजरा.
  धन्यवाद
  आभारी आहोत.

  • खरंय ! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय महत्वाचा !!
   आपणा सर्वांना प्रबोधनाचे हे काम करायचयं.
   खूप खूप धन्यवाद !!!

 16. Ar vinayak Rasal says:

  A bit different but very effective way of social awareness work ….. great sir.

 17. Dhananjay pawar says:

  अति उत्तम सर,
  सोनाराने कान टोचलेले चांगले. तुमच्या प्रत्येक लेखातून अस नाही तर तुमच्या कामातूनच मला फार काही शिकायला मिळाले आहे

Leave a Reply

%d bloggers like this: