आरोग्याची फाईल

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

आरोग्याची फाईल


“डॉक्टर, मला ब्लडप्रेशरचा त्रास गेल्या पाच वर्षापासून आहे. शुगरचा त्रास सहा वर्षे आहे आणि आजपर्यंत सात डॉक्टर झाले, पण समाधान वाटत नाही. दम लागतो , डोक्यात मुंग्या येतात, चक्कर येते …..”

मी त्यांना विचारतो, “गेल्या सहा वर्षातील शुगरचे रिपोर्ट कुठयत ? ब्लड प्रेशर रेकॉर्ड, कार्डिओग्राम, औषधाच्या चिठ्ठया हे सारं आणलंय का ? “

माझ्यासमोर बसलेला रुग्ण अगदी शांतपणे हा प्रश्न झटकतो आणि म्हणतो, “डॉक्टर साऱ्या तपासण्या नव्यानं करून घ्या . नवीन ट्रीटमेंट द्या. खर्चाची अडचण नाही.”

पण माझी अडचण वेगळीच असते.

एखाद्या आजाराने शरीरात शिरकाव केल्यापासून तो आजार आज किती प्रमाणात आहे ? तो वाढतोय , कमी होतोय की स्थिर आहे ? त्याचे सर्व अवयवांवर काही परिणाम झालेत का?तसे झाले असतील तर ते किती आणि कुठे झालेत ? आणि , सर्वात महत्वाचे म्हणजे आत्तापर्यंत कोणकोणती औषधे घेतलीत ? त्यांचे डोस काय होते ? सध्या ही औषधे सुरु आहेत का ?

आम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने केवळ उपचारासाठीच नव्हे, तर तो आजार लवकरात लवकर कसा आटोक्यात आणता येईल यादृष्टीने तसेच पुढील म्हणजे उपचाराबरोबर आणि उपचारानंतरची दिशा ठरविण्यासाठी या सर्व माहितीचा उपयोग होतो. कोणत्या बाबतीत रुग्ण कमी पडतोय ? कोणत्या बाबतीत दुरूस्त्या सुचवायला हव्यात ? आजार सुरु झाल्यापासून रुग्णाने आजारावर नियंत्रण मिळवले आहे की नाही? औषधाची अँलर्जी आहे का ? असल्यास ॲलर्जीचा कोणत्या प्रकारचा त्रास झाला होता ? पूर्वी कोणते उपचार घेतलेत ?आत्ता कोणती औषधे लागू पडतील ? आजार टाळण्यासाठी हा रुग्ण कोणती पथ्ये पाळू शकेल ?

हा सर्व वैद्यकीय इतिहास (Medical History ) महत्वाचा असतो. त्यासाठी हा इतिहास प्रत्येक रुग्णाने कागदोपत्री जपणे महत्वाचे असते. अशा प्रकारची माहिती एकत्र करून ठेवली असल्यास उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे काम सोपे होते. वारंवार होणारा तपासण्यांवरील अनाठायी खर्च वाचतो. आजाराचे नेमके निदान तेही कोणताही प्रकारचा विलंब न होता करणे शक्य होते. थोडक्यात वेळ -पैसा-एनर्जी सारेच वाचते.आणि प्रकृतीची संभाव्य हानी टाळली जाते हे आपण विसरतोच .एवढेच नव्हे तर एखादी वैद्यकीय आपत्ती (emergency) दुर्दैवाने ओढवली , जसे की , अचानक आवश्यक असणारी शस्त्रक्रिया, अपघाता सारखा दुर्दैवी प्रसंग यांना सामोरे जावे लागले तर , अशा प्रसंगी आवश्यक असणाऱ्या तातडीच्या उपचारासाठी ही माहितीची फाईल म्हणजे  ‘देवदूतच’ ठरते . पण असा आरोग्याचा इतिहास जपल्याचा सरसकट अनुभव आम्हा डॉक्टरांना येत नाही .

पूर्वी घेतलेल्या औषधांचे ‘प्रिस्क्रिप्शन्स’ , पूर्वी केलेल्या रक्ताच्या किंवा इतर चाचण्या, तारखेनुसार आपापल्या फाईलमध्ये ठेवाव्यात.

डाॅक्टरांनी दिलेली सर्वच्या सर्व औषधे बऱ्याचदा त्या त्या आजारपणाच्या कालावधीत घेतली जात नाहीत. पूर्वी आलेली आजारपणे , निदान केल्याचे पुरावे ( म्हणजे रिपोर्टस् ) , त्यांच्या उपचाराचा कालावधी, त्यावेळी कोणती औषधे किती दिवस घेतलीत ? कोणती घेतली नाहीत ? याचा सारा तपशील लिहून ठेवावा.

मुलांच्या बाबतीत जन्मतारखेच्या दाखल्यापासून, लसीकरण केल्याच्या नोंदी , त्यांच्या आरोग्याच्या बारीक सारीक तक्रारी ( ठराविक काळाच्या अंतराने उदा. प्रत्येक वाढदिवसादिवशीचे ) इत्यादी नोंदी , त्या त्या वेळी आळस न करता ठेवाव्यात. ही चांगली सवय सर्वांनी लावून घेतली, तर त्यामुळे आपला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फायदाच होणार आहे .

आपण एकविसाव्या शतकात आलो. त्यालाही आता एकवीस वर्षे पूर्ण होत आली. कॉम्प्युटर, इंटरनेटने सारे विश्व व्यापले. प्रत्येक सेकंदाचा वापर खुबीने कसा करता येईल याचा विचार झाला. पण आज आपण आरोग्याच्या बाबतीत कुठे आहोत? सार्वजनिक आरोग्याची तर ‘वाट’ बिकटच झाली हे सर्वांना ठाऊक आहे, पण वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत तर आपण खरेच सजग झालो आहोत का?  याचे उत्तर नक्कीच अनेकांच्या बाबतीत ‘नाही’ असे आहे.

धकाधकीच्या या जीवनात दररोजच्या कामांच्या यादीत ‘आरोग्य’ हा मुद्दा कुठच्या कुठे फेकला गेलेला असतो. जेव्हा emergency निर्माण होईल तेव्हाच डोळे उघडतात, म्हणजेच काट्याचा नायटा झाल्याशिवाय डॉक्टरांचे तोंड पहायचे नाही , अशी अनेकांची मानसिकता असते . मुद्दा आहे तो आरोग्याबद्दल जागे होण्याचा, जागे राहण्याचा. आरोग्य ही बाब सर्वात महत्वाची आहे याची नोंद घेण्याचा.

थोडा विचार करा. आपण आयुष्यात केंद्रस्थानी ठेवतो तो ‘पैसा’. पैसा मिळवून देणारी प्रत्येक गोष्ट अनेकांना महत्वाची वाटते. जास्त पैसा मिळवून देणारी जास्त महत्वाची ! यात आपण गुरफटत जातो. दैनंदिन जीवनाच्या रहाट गाडग्यात आपल्या आपण करावयाच्या महत्वाच्या गोष्टींच्या यादीत भलत्याच गोष्टी अग्रस्थानी असतात. या यादीत ‘आरोग्य’ कुठे आहे ते शोधावे लागते.  आयुष्यात केंद्रस्थानी ‘आरोग्य’च हवे.

केवळ आरोग्याच्या नोंदीचा विचार केला तरी , आपण त्याबाबत खूप बेदखल असतो. जमिनीच्या व्यवहाराची एखादी फाईल, सात-बारा, आठ-अ, गाडीचे खरेदीपत्र , गाडीच्या इन्शुरन्सचे पेपर, एवढेच नव्हे तर सध्या चलनात असलेली दोन हजाराची, पाचशेची, फार कशाला दहाची नोटही इकडे तिकडे म्हणजे कुठेही ठेवून टाकत नाही . ती पाकिटात, खिशात जपून ठेवतो . आरोग्याच्या फाईलीचे काय?

वाचकहो २०१८ साल आता उजाडणार . नव्या वर्षात आरोग्याची फाईल ही संकल्पना राबवाल?

जाता जाता : घराबाहेर पडताना आपल्या खिशात आपण जसे आयडेंटीटी कार्ड ठेवतो किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स ठेवतो, त्याच पद्धतीने एक वेगळे ‘हेल्थ कार्ड’ लॅमिनेट करून ठेवावे, ज्यावर आपला  फोटो, पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, जन्म तारीख, रक्त गट, आपल्याला असलेले आजार उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, सुरु असलेली औषधे, औषधाची अलर्जी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तातडीच्या क्षणी ज्यांच्याशी संपर्क करायचा अशा आप्तांची नावे व त्यांचे सध्या सुरु असलेले मोबाइल नंबर इत्यादी तपशील असावा. वेळ सांगून येत नाही. अपघात, दुर्घटना, आपत्ती कधीही येवू शकतात . अशावेळी हे किरकोळ वाटणारे कार्ड जीवदान देऊ शकते. आरोग्य फाईलीइतकेच हे हेल्थ कार्ड महत्वाचे आहे .

 • डॉ . अनिल मडके

33 Responses

 1. ruturaj udgaonkar says:

  very true Sir..this would definately help to create awareness about better self and disease management

 2. विठ्ठल मोहिते says:

  खूप सुंदर लेख. आयुष्यात आरोग्य केंद्रस्थानी व सर्वांसाठी हेल्थ कार्ड टीप ही महत्वाची…!

 3. Satish chavan says:

  Super

 4. Suhas mali says:

  Very nice sir

 5. Dr. Santosh Mane says:

  हेल्थ कार्ड टीप ही महत्वाची आहे. माझ्या सहित कुटुंबाचे व माझ्या नातेवाईकांचे आरोग्य कार्ड तयार करणार आहे.तसेच समाजातील सर्व नागरिकांना आरोग्य कार्ड तयार करण्यासाठी प्रोत्साहन देऊन मदत करेन.
  डॉ. संतोष माने.

  • Dr. Anil Madake says:

   छान ! आपल्याला यासाठी शुभेच्छा !! जनस्वास्थ्य कडून काही मदत हवी असेल तर जरूर कळवा.

 6. Uday godbole says:

  खूप उपयोगी लेख

 7. डॉ. अविनाश भोंडवे says:

  उत्तम लेख आहे सर. खूप आवडला.

 8. Ravindra Mohite says:

  Innovative idea sir

 9. Smita patil says:

  “आरोग्याची फाईल” खूप छान संकल्पना !.प्रत्येकाची असावी.तुम्ही रूग्णाविषयी असणारी तळमळीने , आत्मियतेने लिहलेला लेख खुप आवडला.

 10. Mahavir Khandekar says:

  Thanks for guideline Sir

 11. Sanjaykumar says:

  Thank you sir.Its really essential to each one of us.

 12. Sireen says:

  Beautiful idea doctor
  Health card
  Superb

 13. Sharad Pawar says:

  Thank you for sharing very useful information for people awareness. Now a days it’s needed thing.

  • Dr. Anil Madake says:

   Yes. That’s the fact . Thanks !!!

   • Ramesh N. Sarde says:

    सर जय जिनेंद्र ।

    मला अभिमान आहे आपल्या सारखा समाजहितैषि डॉक्टर माझा मित्र, सखा मार्गदर्शक आहे…

    आपण उत्तम डॉक्टर तर आहातच, पण त्याहीपेक्षा एक सुह्रदयी माणूस आहात, याचा मी वारंवार प्रत्यय घेतला आहे..

    बदलत्या काळानुसार बदलत्या सोशल मीडिया चा वापर आपण आरोग्य जाग्रुतीसाठी करताहात याचा आनंद आहे…

   • Dr. Anil Madake says:

    आपले शब्द आरोग्य चळवळीचे बळ देतात. मन:पूर्वक धन्यवाद !!! 🙏🏻

 14. M B Mohire says:

  Health card…… Best idea Sir

 15. Pooja Patil says:

  “आरोग्याची फाईल “ही संकल्पना सवॉची असली पाहीजे.

  खूप सुंदर लेख आहे.

 16. Dattatray says:

  Health card system is imp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *