तुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट ?

तुम्हाला तुमचे पाय हवेत की सिगारेट ?

साधारण दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट. वेळ सकाळी सहाची. गजर वाजण्याऐवजी फोनची रिंग वाजली. आय.सी.यू.मधून फोन होता. “ सर ईमर्जन्सी ॲडमिशन आहे. श्री.साबळे नावाचे आपले जुने पेशंट आलेत.……”

“आलोच !” असे म्हणून लगबगीने मी निघालो.

आयसीयूत  पोहचेपर्यंत श्री.साबळेंचा वैद्यकीय इतिहास झर्रकन माझ्या डोळ्यासमोर आला. सांगलीपासून वीस-बावीस किलोमीटर अंतरावरच्या गावात राहणारे श्री. साबळे हे पेशाने वकील. वय पन्नाशीच्या उंबरठयावर. पण तिशीची चपळाई. ‘चाळिशी’ विरहित चेहरा. दिलखुलास स्वभाव. नेहमी हसतमुख. खरं तर अशा वर्णनाच्या माणसाचं ब्लडप्रेशर नॉर्मल असायला हवं, असं कुणालाही वाटेल. पण काही वेळा तसं नसतं.

साबळेना ‘उच्चरक्तदाब’ होता. त्यांच्या बाबतीतली आणखी एक गोष्ट म्हणजे हे गृहस्थ

‘ तंबाखू ‘ खायचे आणि सिगारेटही ओढायचे . वारंवार सांगूनदेखील कदाचित ‘या’ केसमध्ये ते वकील असल्यामुळे त्यांना मी तंबाखू-सिगारेटचे दुष्परिणाम पटवून देण्यात कमी पडलो की काय कुणास ठाऊक ? ते तंबाखू सोडायला तयार नव्हते की सिगारेट ! कोर्टातील एकही ‘तारीख’ न चुकविणारे हे सद्गृहस्थ उपचाराच्या ’तारखा’ मात्र पाळायचे नाहीत .

आय.सी.यू.च्या बेडवर पडलेल्या साबळेंचा चेहरा आज पूर्णपणे उतरला होता. वेदनेने ते अक्षरश: विव्हळत होते.

“डॉक्टर माझे दोन्ही पाय दुखताहेत हो ! काहीतरी करा तातडीनं !”

“कधीपासून त्रास सुरु झालाय?”

“सुरवातीला थोडा बधीरपणा, मुंग्या येत होत्या. काल रात्री अकरा वाजल्यापासून पायात तीव्र कळा यायला लागल्या”, त्यांचे चिरंजीव उत्तरले.

“रात्री अकरा वाजल्यापासून त्रास सुरु झाला तर, यायला इतका का वेळ केलात?” मी त्यांच्या चिरंजीवाना प्रश्न केला.

“डॉक्टर,आमच्या घरी वेदनाशामक गोळ्या होत्या, त्या आधी ‘ट्राय’ केल्या. तासभर वाट

पाहिली. कमी आलं नाही म्हणून फॅमिली डॉक्टराना उठवलं. त्यांनी दोन इंजेक्शन्स दिली. थोडा वेळ कमी झाल्यासारखं वाटलं. पण पुन्हा दुखणं वाढलं. मग फॅमिली डॉक्टरना घरीच बोलावलं, त्यांनी सांगितलं, ‘तुमच्याकडे जा’. एव्हाना रात्रीचे दोन वाजले होते. त्यांना मोटारसायकलवर बसायच झालं नसतं . म्हणून, ट्रॅक्स किंवा फोर व्हीलर मिळते का ते पाहिलं. गावात दोन ट्रॅक्स आहेत पण एकही  ड्रायव्हर जाग्यावर नव्हता. शेवटी काही तरी करून एकाच्या मिनतवाऱ्या करून आत्ता आलो.”

इंटरनेट-मोबाईलच्या या युगात वीस-बावीस किलोमीटरच्या अंतरावरील शहरात पोहोचायला ‘वकील-रुग्णाला’ चार तास मोजावे लागले होते. प्रत्येक खेडयात, रात्रीच्या प्रहरी एक चार चाकी वाहनासह ड्रायव्हर ‘ऑनकॉल’ असावा, असं  त्याक्षणी मला वाटून गेलं.

अर्थात रुग्णाची तपासणी करत करतच मी त्यांच्याशी संवाद साधत होतो.

 रुग्णाच्या पायाची नाडी लागत नव्हती. पायाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्या असल्याचा मी मनोमन निष्कर्ष काढला. वेदना कमी करण्यासाठी तातडीने इंजेकशन्स दिली आणि ‘कलर डॉपलर तपासणी’ त्वरित करण्याचं ठरवलं.

अर्ध्या एक तासात कलर डॉपलर रिपोर्ट आला. दोन्ही पायाच्या रक्तवाहिन्यांत रक्त वाहून नेणाऱ्या पोटातील मोठ्या रक्तवाहिन्यांत

गुठळीचा मोठा अडथळा निर्माण झाला होता .

रक्तवाहिनीतील मोठी गुठळी औषधाने विरघळणे शक्य नव्हते. तातडीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय  नव्हता.

तातडीने निर्णय घेऊन त्यांना  शस्त्रक्रियेसाठी मिरजेच्या रुग्णालयात पाठविले.

पण दुर्देवाने शस्त्रक्रियेमुळे फायदा झाला नाही. शस्त्रक्रिया तर झाली पण रुग्ण दगावला.

तंबाखू-सिगारेटमुळे होणारा दाह आणि अडथळा यामुळे त्रास झाल्यास विकारग्रस्त झालेला पाय बऱ्याचदा  काढून टाकावा लागतो. इथे ‘तंबाखू आणि सिगारेट’नं पायासह सर्व देहाला, एका कार्यकुशल व्यक्तिमत्वाला खाक करून टाकले होते.

तंबाखू सिगारेटमुळे कॅन्सर होतो, हे सर्वानाच माहित असते. तंबाखूमुळे रक्तवाहिन्यांमध्ये दाह आणि अडथळे निर्माण होऊन हात-पाय निकामी होऊ शकतात. प्रसंगी जीवावर बेतू शकतं. याबाबत बरेच जण अनभिज्ञ असतात. म्हणूनच वैद्यकशास्त्र म्हणतं, ‘तुम्हाला तुमचे पाय हवेत कि सिगारेट?’

नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे १ जानेवारी हा ‘धूम्रपान विरोधी दिन’ आहे. तुम्ही जर तंबाखू सेवन अथवा धूम्रपान करीत असाल तर,नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ते सोडण्याचा संकल्प कराल ?

⁃डाॅ अनिल मडके

28 Responses

 1. ruturaj udgaonkar says:

  irreversible complications come as silent killer..very good article Sir!

 2. Sonu Gavali says:

  Excellent article

 3. Lovely article

 4. Dr.pramod borgaonkar says:

  Need to read everyone….nice sir..

 5. Suresh Kanire says:

  An eye opener and very helpful article, indeed.

 6. Suhas mali says:

  Very nice sir

 7. Pranav says:

  This is untouched area in the awareness of non tobacco….

  ##Great article##

  • Dr. Anil Madake says:

   Yes. Tobacco & Smoking cause many hazards on different organs of body.
   Thanks !!!

 8. Arvind p Kulkarni says:

  जनजागृती जनस्वास्थ्या करता
  सुंदर

 9. H.vivek says:

  Sir do you have any therapy to quit smoking? ? Buproprion too is not working

  • Dr. Anil Madake says:

   Yes.
   One should have prepared mind.
   You can communicate me.
   Kindly see contact details on website.

 10. Anand Chivate says:

  Excellent Article Sir…

 11. Dr. Machindra Patil says:

  Nice article madke air.

 12. Interesting and impacting.

Leave a Reply

%d bloggers like this: