किस्सा एका सर्टिफिकेटचा

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

किस्सा एका सर्टिफिकेटचा

”डॉक्टर, असं सर्टिफिकेट तुम्ही देऊच कसं शकता ?”

”कोणतं सर्टिफिकेट ?”

” माझ्या बहिणीचं सर्टिफिकेट.”

” हे बघा ,तुमच्या बहिणीचं नाव सांगा, त्यांचा केसपेपर दाखवा, कार्ड दाखवा … असं काहीतरी निश्चित सांगितलंत तर मग माझ्या काहीतरी लक्षात येईल !”

समोर बसलेल्या तिशीच्या तरुणानं त्याच्या बहिणीचे ,जी माझी पेशंट होती, तिचे केसपेपर माझ्यासमोर ठेवले. त्यातील मराठीत लिहिलेलं एक सर्टिफिकेट माझ्या हातात देत तो म्हणाला, ”हेच ते तुम्ही दिलेलं सर्टिफिकेट.”

मी ते प्रमाणपत्र नीट न्याहाळलं. चक्क माझ्या लेटरहेडची चोरी करून कुणीतरी चार ओळी लिहिल्या होत्या . ‘ ……पेशंट हा क्षयरोगाने म्हणजे टी. बी.ने आजारी असून हा आजार बरा होऊ शकत नाही .सबब त्याचे पती श्री…………..यांनी दुसरा विवाह करावा.’

खाली खोटी सही. शिक्का नव्हताच.

हे सर्टिफिकेट पाहून मी क्षणभर हादरलोच . मजकूर वाचून सुन्नही झालो.

एखाद्या आजाराविषयी आपल्याला हवा तसा गैरसमज करून घेऊन असा भष्टाचार (फ्रॉड) होऊ शकतो , हे मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.

हे सर्टिफिकेट खोटे असल्याचे मी समोर बसलेल्या तरुणाला समजावून सांगितले. एवढेच नव्हे तर सहा महिन्याचा उपचारानंतर त्याची बहीण पूर्ण बरी झाल्याचा निर्वाळाही दिला .

क्षयरोगाचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे , क्षयरोगाविषयी आणि एकंदर आरोग्याविषयी अज्ञान  व अंधश्रद्धा. आजही बऱ्याचजणांना क्षयरोग पूर्ण बरा होत नाही असे वाटते .पण सहा ते नऊ महिन्याच्या नियमित आणि योग्य औषधोपचारांनी  क्षयरोग संपूर्णपणे बरा होतो. आज उपलब्ध असलेल्या क्षयरोगावरील प्रभावी औषधोपचारांमुळे संसर्गजन्य रोगी फक्त तीनच आठवड्यांत असंसर्गजन्य होतो. म्हणजे अशा रुग्णापासून इतरांना त्यानंतर क्षयरोगाचा धोका उरत नाही. अर्थात ‘नियमित आणि योग्य  औषधोपचार’ हा यातील कळीचा मुद्दा आहे.

आजही क्षयरोगाविषयी अनेक गैरसमज अनेकांच्या मनात घर करून आहेत.  क्षयरोगी  व्यक्तीकडे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष . . . एका विचित्र नजरेने समाज पाहतो . मग ती नजर विवाहापूर्वी असो अगर विवाहानंतर.

हे चित्र आता आता बदलायला हवे. क्षयरोगविषयीची वस्तुस्थिती समाजातील सर्व स्तरांत पोहोचावयास हवी. कारण आजही या आजाराचा सामना करून त्याला नामशेष करण्याऐवजी समाजातील  काही उठाठेवी व्यक्ती या आजाराचा पूर्णतः चुकीचा समज करून गैरमार्गाचा अवलंब करतात.

ज्या जोडीदारावर प्राणाहून अधिक प्रेम करायला हवे, त्या जोडीदाराला केवळ क्षयरोग झाला म्हणून घटस्फोट द्यायला उठतात, याहून मोठे दुर्देव ते कोणते?

२४ मार्च हा ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जगभर क्षयरोगाविषयी प्रबोधन केले जाते . या  निमित्ताने दरवर्षी एक घोषवाक्‍य जागतिक आरोग्य संघटना जाहीर करते. यावर्षीचे घोषवाक्य आहे ‘ Wanted : Leaders for TB free world ‘.  थोडक्यात ‘ जग क्षयमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणारे हवेत. ‘

क्षयमुक्तीसाठी पुढाकार घ्यायचा म्हणजे आपण सर्वांनी क्षयाविषयी जाणून घ्यायचे आणि क्षयरोगाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रत्येकाने निष्ठापूर्वक प्रयत्न करायचा.

शरीरातील जवळपास प्रत्येक अवयवाला होणारा क्षयरोग हा फुप्फुसामध्ये अधिक प्रमाणात आढळतो. फुप्फुसाचा क्षयरोग थुंकीतून पसरतो. कुठेही थुंकल्याने त्यातील क्षयाचे जंतू बराच बऱ्याच कालावधीसाठी जिवंत राहतात आणि हवेतून ते निरोगी व्यक्तीच्या प्रवेश करतात आणि निरोगी व्यक्तीला क्षयाची बाधा होते. यासाठी ज्या रुग्णांच्या थुंकीत जंतू आहेत , अशा सर्वांनी आपली थुंकी निर्जंतुक होईपर्यंत कुठेही थुंकण्याचे टाळावे. खोकताना, शिंकताना नाकावर रुमाल लावावा. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून तो पूर्णपणे बरा होतो, याची खूणगाठ सर्वांनी मनाशी बांधायला हवी.

अजूनही क्षयरोगाबद्दल अनेकांच्या मनात भीती आणि अज्ञानाचे वास्तव्य आहे. क्षयरोग पूर्ण बरा होण्यासाठी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी म्हणजे किमान सहा ते नऊ महिने या कालावधीसाठी न चुकता औषधोपचार घेणे महत्त्वाचे असते.

संध्याकाळचा ताप येणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, खोकला येणे, खोकल्याबरोबर थुंकी-बेडका-कफ येणे तसेच थुंकीतून रक्त पडणे इत्यादी तक्रारींकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि दिलेला औषधोपचार नियमित घ्यावा.

क्षयरोगाच्या बाबतीत बऱ्याचदा काय होते की, उपचार सुरु केल्यानंतर या तक्रारी काही आठवड्यातच कमी होतात किंवा पूर्णपणे थांबतात आणि त्यामुळे अनेकांना आपला आजार बरा झाला असे वाटते. पण ते खरे नसते. क्षयरोग पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान सहा ते नऊ महिने औषधोपचार महत्त्वाचा असतो.

क्षयरोग प्रत्येकालाच होतो असे नाही. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते त्यांना क्षयरोगाचा धोका अधिक असतो. विशेषतः एच आय व्ही एड्स बाधित व्यक्ती, मधुमेही व्यक्ती, कुपोषित व्यक्ती, मद्यपान-धूम्रपान करणाऱ्या तसेच मादक द्रव्ये घेणाऱ्या व्यक्ती, मानसिक विकाराने ग्रस्त व्यक्ती, कर्करोग किंवा इतर दीर्घकालीन आजारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेणाऱ्या व्यक्ती, खूप दिवस अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती.. अशा सर्वाना क्षयरोगाचा धोका अधिक असतो. त्यामुळे वर नमूद केलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घेणे हे महत्त्वाचे. कुठेही थुंकण्याची सवय ही समाजासाठी घातक सवय आहे हेही आपण सदैव लक्षात ठेवायला हवे.

क्षयरोग दिनाच्या निमित्ताने, ‘ क्षयरोग कसा होतो, तो कसा पसरतो आणि तो पूर्णपणे बरा होण्यासाठी कोणती काळजी घ्यायची ‘ हे सर्वांनी जाणून घेणे आणि ते इतरांना सांगणे हे जग क्षयमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल.

 

डाॅ.अनिल मडके

23 Responses

 1. Shrenik says:

  Nice article sir…

 2. Pranav says:

  Nice and informative bolg

 3. Pallavi tate says:

  Yes, public awareness is very important.

 4. Sayali says:

  Leaders for TB free world😎nice sir!!

 5. Anand Chivate says:

  Excellent Blog Sir Ji…..

 6. Ajeet Aravindan says:

  Very True Sir. Unawareness and Ignorance are 2 hurdles in this Society.

 7. Pooja Patil says:

  Very nice and very important

 8. Anand sapkal says:

  Very nice

 9. विठ्ठल says:

  समाज सेवा हा एक वेगळा आंनद आहे.वेगळी माहिती मनाला आंनद देऊन जाते.धन्यवाद

 10. juber says:

  Very nice information sir

 11. Sunil says:

  Nice information sir

 12. Saurabh Khutale says:

  very nicely written.
  esp.
  ज्या जोडीदारावर प्राणाहून अधिक प्रेम करायला हवे, त्या जोडीदाराला केवळ क्षयरोग झाला म्हणून घटस्फोट द्यायला उठतात, याहून मोठे दुर्देव ते कोणते?
  are truly touching lines.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *