आयुष्यात संकटे यावीत !

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

आयुष्यात संकटे यावीत !

संकट …..! हा एक शब्द उच्चारताच त्याची अनेक रूपे आपल्या डोळ्यांसमोर थैमान घालू लागतात. ‘संकट येतंय ‘ असे म्हटले तरी नको असणारे अनेक विचार आपल्या मनात येतात. जीवन जगायचे म्हटल्यानंतर संकटे ही येणारच. जीवनात जसे सुख मिळते, आनंद मिळतो, तसे दु:ख आणि संकटेसुद्धा येणारच. मात्र संकट आले की, मन घाबरून जाते; काही सुचत नाही; कशाकशात  लक्ष लागत नाही …. काय करावे?

संकटांबद्दल विचार करताना ‘प्रत्येक संकट म्हणजे एक भयंकर गोष्ट आहॆ’ असे प्रत्येकाला वाटते आणि त्यामुळे किरकोळ सर्वसामान्य प्रश्नसुद्धा सारे आयुष्य व्यापून टाकतात. जर आपण काळजीखोर असू तर छोटे संकटसुद्धा अक्राळ-विक्राळ वाटते, आपली झोप उडते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या कामावर होतो.

यासाठी संकट आले तर भिऊन जाऊ नये. त्याचे स्वागत करावे. कारण संकटे फक्त भित्र्या माणसांनाच घाबरवतात. संकटाना घाबरले कि, संकटे मोठी वाटायला लागतात. एखादा छोटा दगड जर डोळ्याच्या निकट धरला तर आपल्या डोळ्यासमोरचे काहीच दिसत नाही. दगड जसा डोळ्यांपासून दूर नेऊ , तसे आपल्याला आजूबाजूचे दिसू लागते. संकट हे छोट्या मोठ्या दगडासारखेच असते . त्याला जितके निकट आणून विचार करु , तितका त्याचा त्रास संभवतो .मनोमन संकटापासून दूर होऊन थोडा विचार करावा …म्हणजे या संकटावर मात करण्याच्या संभाव्य शक्यतांचा विचार करावा.

आपल्याला जर उत्कर्ष साधायचा असेल तर संकटांना संधी मानावे. संकटाना जो संधी मानतो , तो आशावादी असतो आणि तोच या जगात काही कार्य करून दाखवू शकतो. संधीलाही जो संकट मानतो तो निराशावादी असतो. त्याच्या हातून काही काम होत नाही. अशा लोकांना आयुष्य हेच एक संकट वाटत असते. हे लोक कधी हसताना दिसत नाहीत, यांच्या आयुष्यातील सुख-समाधान हे संकट, भीती आणि निराशा यांनी नाहीसे केलेले असते. संकटाला संधी मानल्यामुळे कार्यशक्ती जागी होते आणि संकटाची उंची कमी वाटायला लागते. त्यासाठी मन शांत ठेवून संकटावर मात करायला हवी. आपल्याकडे कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणते चांगले गुण आहेत, आपण आयष्यात काय काय चांगले करू शकतो याचा त्या क्षणी विचार करायला पाहिजे. पण हे होत नाही.

याबाबतची एक गोष्ट प्रचलित आहे.

एकदा एका शिक्षकांनी वर्गात समोरच्या भिंतीवर एक भलामोठा पांढरा  कागद चिकटविला . त्या कागदाच्या मध्यभागी एक छोटासा  काळा  ठिपका दिला. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या कागदाकडे पाहायला सांगितले आणि एक प्रश्न केला, “तिथे काय दिसते?” प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तर दिले, “सर, मला एक काळा  ठिपका दिसत आहे.” “काळ्या ठिपक्याशिवाय आणखी काय दिसते?” शिक्षकानी  पुढे विचारले.

सर्व विद्यार्थी एका सुरात उत्तरले, “आम्हाला काळ्या ठिपक्याशिवाय बाकी काहीच दिसत नाही.”

शिक्षकांनी सांगीतले, “मुलांनो, या भल्या मोठ्या कागदाचा भरपूर पांढरा भाग मला दिसत आहे आणि त्याच्या आकाराच्या मानाने काळा  ठिपका  खूपच लहान आहे.”

आपल्या जीवनात नेमके हेच घडते. आयुष्यात आलेले संकट या काळ्या ठिपक्यासारखे असते आणि त्यावेळी मोठ्या पांढऱ्या कागदाप्रमाणे आपल्याकडे असलेले चांगले गुण आणि सुखाची साधने आपण विसरून जातो. कदाचित आपल्या आयुष्यात या पांढऱ्या कागदावर एकापेक्षा अधिक काळे ठिपके असतील.  पण लक्षात ठेवायला हवे की, आयुष्याच्या या पांढऱ्या कागदावर संकटांच्या काळ्या ठिपक्यांचे प्रमाण, क्षेत्रफळ खूपच कमी असते. काळे ठिपके सोडले तर, पांढरा  भाग म्हणजे आपली शक्ती आपल्याकडे असते. त्याचा विचार करावा. त्याचा वापर करावा.

आपल्या आयुष्यात वाईट काय घडले? संकटे किती आली ? कोणती आली? यांचा विचार करीत बसू नये. भूतकाळातील अपयशांचा विचारही करू नये. आपल्याला संधी कोणत्या मिळाल्या, आपण कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या याचा हिशोब करावा. त्यामुळे आपल्याला आपली ताकद कळेल , ताकद येईल आणि आपल्याला तणावमुक्त होता येईल.

संकटांमुळे दोनच गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे खंबीरपणे त्यावर आपण मात केली तर संकटच नाहीसे होते. याउलट खचून गेलेली, हतबल झालेली, केवळ अस्वस्थ होऊन ‘स्वस्थ’ बसलेली व्यक्ती संकटांची शिकार होते. कधी-कधी ती व्यक्तीच संपते. आपल्याला जर संकटावर मात करायची असेल…म्हणजे , संकटालाच जर शिकार बनवायचे असेल तर काय केले पाहिजे? …तर सर्वात आधी आपल्यावर आलेल्या संकटाची भिती मनातून काढून टाकायला हवी.

संकटाविषयीच्या भीतीमुळे मनांत चिंता निर्माण होते. काळजी निर्माण होते. चिंता आणि काळजी या शब्दांच्या मागोमाग त्रागा आणि वैताग हे येतात. त्यातून शारीरिक नुकसान होते. अशा ताणतणावांमुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर ताण येतो, इतर व्याधींना आमंत्रण मिळते. म्हणून संकटांकडे शांतपणे पाहावे. संकटांवर प्रेम करावे आणि त्यांना हाताळावे. म्हणजे आपले शारीरिक आणि मानसिक नुकसान टळेल. म्हणून संकट आले तरी वृत्ती प्रसन्न ठेवावी; मन खंबीर करावे; संकटाचा सर्व बाजूंनी विचार करावा. संकटाचे गांभीर्य जोखून आपले सर्व सामर्थ्य, बळ एकवटून संकटावर हल्ला करावा.  

आलीजरीकष्टदशाअपार

नटाकितीधैर्यतथापिथोर

संकटाच्या वेळी मन डगमगून चालत नाही. मन कमकुवत झाले तर पराभवाची शक्यता असते. जर हातात घेतलेले म्हणजेच ‘ संकटाशी मुकाबला करायचे ‘ काम कठीण असेल तर ते आपली परीक्षा घेण्यासाठीच आले आहे असे मानावे व त्याच्याशी दोन हात करावेत. संकटाच्या प्रसंगी शक्यतो मुकाट्याने काम करीत राहावे . दु:ख सर्वांनाच भोगावे लागते. दु:खांत कोणी वाटेकरी नसतो. म्हणून संकटाची, दु:खाची चर्चा करणे व्यर्थ आहे. आपले दु:ख इतरांच्या चेष्टेचाही विषय होऊ शकते. म्हणून दु:ख मुकाट्याने गिळावे.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, संकटे ही कायमची नसतात. कोणत्याही संकटाचे आयुष्य कमी असते. संकटे क्षणभंगूर असतात. म्हणून संकट दूर होईपर्यंत थोडा धीर धरावा आणि भरपूर परिश्रम करावेत.

संकटे पाहून नेपोलियनला अतिशय आनंद होत असे. नेपोलियनचा उत्साह वाढत असे. नेपोलियनने म्हटले आहे की, ‘मात करता येत नाही, असे कोणतेच संकट नसते. अचानक आलेल्या संकटाला तोंड देण्याची हिंमत प्रत्येक माणसात असते, पण बऱ्याच जणांना याचा नेमका विसर पडतो आणि त्यामुळे संकटातून येणाऱ्या अडचणींची काळजी करीत ते संकटापासून दूर पळतात. हे भ्याडपणाचे आणि त्याहूनही मूर्खपणाचे लक्षण म्हणावे लागेल.  

‘संकटे मला सतत येऊ देत, त्यामुळेच मला तुझे स्मरण राहील’ अशी प्रार्थना कुंतीने देवाजवळ केली होती. जगातील अनेक व्यक्तींनी संकटांशी  मुकाबला केला. त्यांना धीराने तोंड दिले. म्हणूनच ते जगद्विख्यात झाले, अजरामर झाले.

संकट हा सत्याकडे जाणारा मार्ग आहे. संकट आले तरच खऱ्या अर्थाने आपल्या मित्रांची, आपल्या नातेवाईकांची पारख होते. नेहमी गोड बोलणारी माणसे संकटकाळात ‘गोड वागणे’  टाळून इतर सल्ले  कसे देतात याची प्रचिती येते आणि माणसांची परीक्षा होते. संकटांमुळे जशी इतरांची परीक्षा होते, तशी ती  आपल्यासाठीसुद्धा परीक्षाच असते. ही परीक्षा परमेश्वर घेत असतो. परमेश्वराने आपल्या सर्वाना चांगल्या रीतीने हाताळण्यासाठी दिलेले हे जीवन जगताना जर आपल्या वाट्याला फक्त सुख, चैन, ऐषआराम  असे सारे मिळाले , तर बऱ्याचदा हे जीवन देण्याऱ्या परमेश्वराला आपण विसरून जातो. परमेश्वराचे अस्तित्व आपण विसरू नये म्हणून कदाचित त्याने संकटांची निर्मिती केली असावी.

जीवनाचा अर्थ चैनीत राहून समजत नसतो. जसे चैन म्हणजे आनंद नव्हे, तसेच कष्ट-परिश्रम म्हणजे दु:ख नव्हे. चैन करणारा माणूस हा बहुधा संकुचित विचारांचा असतो; तर कष्ट करणारा माणूस हा विशाल, उदात्त विचारांचा असतो. कारण कष्ट करणारा माणूस संकटाना तोंड देत असतो. त्याला सुखाचा खरा अर्थ समजलेला असतो. आपल्या जीवनात जर संकट आले नाही, तर प्रगतीचे चाक थांबेल, आणि विचारशक्तीच नष्ट होईल.

म्हणून जसे पांढऱ्या कागदाचे अस्तित्व काळ्या ठिपक्याशिवाय लक्षात येत नाही, सावलीचे महत्व उन्हाचे चटके बसल्याशिवाय समजत नाही, उजेडाचे महत्व गडद अंधाराच्या अनुभवाशिवाय कळत नाही, तसेच सुखाच्या-आनंदाच्या क्षणांचे महत्व लहान-मोठ्या दु:ख दायक, त्रासदायक घटनाशिवाय, संकटांशिवाय कळत नाही.

म्हणून वाटते…, आयुष्यात संकटे यावीत.

– डाॅ. अनिल मडके

20 Responses

 1. विठ्ठल मोहिते says:

  संकटाना सामोरे कसे जावे.. याचा राजमार्ग…!!!

 2. Satish Chavan says:

  Great

 3. Sireen says:

  खुप सुंदर.
  खरे आहे संकटं आल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थ कळत नाही.
  Nice doctor.

 4. Pramod says:

  Dr Anil, Very Nice Article. Fact of the life.

 5. kalpana patil says:

  खरंच आहे, संकटांना घाबरून चालणार नाही,हिमतीने त्याला सामोरं जायला पाहिजे.

  • Dr. Anil Madake says:

   हो अगदी बरॊबर !
   मनःपूर्वक धन्यवाद !!

 6. Arpita Joshi says:

  Nakkich Sankat yavit , tyamule aaplya patratecha kas lagto ani aapli strenth kalate.

 7. juber says:

  अगदी बरोबर आहे सर जेव्हा पर्यंत संकट काय आहे हे समजत नाहि तो पर्यंत मानुस यशस्वी होत नही

 8. Pooja Patil says:

  खूप छान लेख आहे.
  जो संकटाशी सामना करतो.तोच जीवनात यशस्वी होतो.

 9. Pranav says:

  आत्ता पर्यंतचा सर्वात सुंदर Blog.संकट नसून ती संधी असते स्वतःला सिद्ध करण्यचि…

  Thank you…!!!!!

 10. Anand Chivate says:

  Nice Sir & Thanku for giving Confidence & Gud. Example to fight against the problems in Life…..

 11. Girish says:

  Awesome Post sir, thanks for motivating us.

Leave a Reply

%d bloggers like this: