उन्हाळ्यातील दमा

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

उन्हाळ्यातील दमा

उन्हाळा सुरु झाला की , कांही जणांची भितीने घाबरगुंडी उडते कारण, उन्हाळ्याच्या ठराविक महिन्यातील ठराविक दिवसांत ‘दम्या’ चा त्रास होणार , याची त्यांना कदाचित खात्री वाटत असते. छाती गच्च होणे, प्रचंड धाप लागणे, कोरडा खोकला येणे , अचानक अस्वस्थ वाटणे या तक्रारींची मनात धास्ती असते. या सर्व तक्रारी दम्याचा अटॅक आल्याचे दर्शवितात .

दमा हा श्वसनलिकांचा विकार आहे. फुफ्फुसातील श्वासनलिका काही ठराविक काळासाठी आकुंचन पावून अरुंद होतात , त्यामुळे रुग्णास श्वास आत घेण्यास आणि बाहेर सोडण्यास त्रास होतो. या अवस्थेस ‘दमा’ अथवा ‘अस्थमा’ असे म्हणतात. कांही लोकांचा दमा ‘बारा महिने तेरा काळ’ कधीही येऊ शकतो. कांहीचा दमा पावसाळ्यात सुरु होतो. कांहीच दमा हिवाळ्यात तीव्र होतो तर कांहींना ‘उन्हाळ्यात’ त्रास होतो.

उन्हाळ्याच्या दिवसात मोहोर येतात. फुले, फळे बहरतात. साहजिकच हवेत विविध प्रकारच्या परागकणांची संख्या वाढते. उन्हाळ्यात वातावरण कमालीचे तापलेले असते. पाऊस नसल्याने उडणारा धुरळा सहजासहजी पुन्हा जमिनीवर बसत नाही , तो हवेत तरंगत राहतो. उन्हाळ्यात प्रदूषणाचे प्रमाणही लक्षणीय रित्या जाणवते.

उन्हाळ्यातल्या या विविध कारणांमुळे दम्याचा त्रास उद्भवतो किंवा वाढतो. उन्हाळ्यातील दम्याचा कारणांमध्ये आणखीन काही मानवनिर्मित कारणांची भर पडते. उन्हाळ्यात लग्नसराई असते त्यानिमित्त जेवणावळी, मेजवान्या , गोडधोड ….अशी विविध आमंत्रणे असतात. भोजन घालणाऱ्याचा हेतू उत्तम असला तरी , अशा मेजवान्यामधून  खाल्ल्या जाणाऱ्या पक्वान्नांचे परिणाम उत्तम असतीलच असे नाही. अनेक खाद्यपदार्थाची अनेकांना ॲलर्जी असते. मेजवान्यांमधील खाद्यपदार्थ आकर्षक बनविण्यासाठी त्यात खाद्यरंग मिसळले जातात ,याचीही ॲलर्जी काहींना असते. उन्हाळ्यात शीतपेयांच्या चलती असते. शीतपेयामुळे सुद्धा दम्याचा त्रास उदभवू  शकतो.  

मानसिक ताणतणाव हा दम्याचा एक महत्वाचा कारणीभूत घटक आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत विशेषतः विद्यार्थी आणि काळजीवाहू पालक यांचा ताण परीक्षांच्या काळात वाढतो आणि हाच ताण  दमा बळावू शकतो.

एकाच घरातील अनेक व्यक्तींना दमा असला तरी दम्यास कारणीभूत असणारे घटक प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकतात. बऱ्याच दमेकऱ्यांना सर्दीचाही त्रास असतो. नाक गळणे, शिंका येणे, नाक गच्च होणे अशा तक्रारी दम्यापूर्वी अथवा दम्याबरोबर येतात.

ज्यांना ‘दम्याची’ …’अटॅकची’ माहिती असते, त्यांची येणाऱ्या ऋतूबरोबर मानसिक तयारीही झालेली असते. त्यामुळे ते दम्याच्या अटॅकला घाबरत नाहीत. पण ज्यांना आयुष्यात पाहिल्यांदा असा त्रास होतो , त्यांना मात्र दम्याचा त्रास सुरु झाला की , छातीवर प्रचंड दाब आल्यासारखे वाटते . डॉक्टरपर्यंत आपण पोहचू किंवा नाही अशी शंका त्यांना भेडसावते. पण घाबरुन दाण्याचे बिलकुल कारण नाही. जितका अधिक ताण घ्याल , तितका त्रास वाढण्याची शक्यता . तितक्याच शांतपणे परिस्थितीला सामोरे जाल , तितकी लवकर बरे होण्याच्या शक्यता अधिक . अर्थात , अशा वेळी स्वत: च डाॅक्टर बनून घरगुती उपचार करण्यात वेळ दवडू नका.

दम्याचा त्रास सुरु झाला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. धाप लागत असेल आणि कोणतीही शास्त्रोक्त चाचणी न करता कुणीतरी ती धाप म्हणजे दमा आहे असे सांगितले असेल , तर कृपया थांबावे . तज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी आणि पल्मोनरी फंक्शन टेस्ट या द्वारे दम्याचे अचूक निदान करता येते.

बऱ्याचदा दमा आणि सी.ओ.पी.डी. यांची गल्लत केली जाते. यांच्यातील फरक पल्मोनरी फंक्शनटेस्ट द्वारेच समजतो. त्यामुळे ही चाचणी महत्वाची ! पिक फ्लोमीटर या छोट्या उपकरणाद्वारे दम्याची तीव्रता आणि येऊ घातलेला अटॅक याविषयी माहिती मिळू शकते.

दम्याचा अटॅक आल्यानंतर रुग्णास बसवावे. पाठीमागे तक्क्या द्यावा. हवा खेळती ठेवावी. सभोवती गर्दी करू नये. अंगावरचे कपडे सैल करावेत. चहा किंवा कोफी प्यायला द्यावी. रुग्णास धीर द्यावा आणि दम्याचे आधीच निदान करून डॉक्टरांनी श्वासावाटे घ्यावयाची औषधे दिली असल्यास ती त्वरित द्यावीत.

 एखाद्या रुग्णाचे औषध दुसऱ्या रुग्णाला लागू पडेलच असे नाही. त्यामुळे स्वतःची आरोग्य तपासणी आणि नियमित योग्य उपचार यांना पर्याय नाही. दमा हा आजार आजकाल खूप घाबरुन जाण्यासारखा राहिला नाही . त्यावर तुम्ही सहज मात करु शकता !!!

– डाॅ. अनिल मडके , सांगली

5 Responses

 1. Smita patil says:

  छान !!!

 2. Smita patil says:

  Very useful information.

 3. Anuja says:

  Nice and helpful .. information

 4. Pranav says:

  Right sir, awareness is require …

  Useful information….!!!!!!!

 5. Anand Chivate says:

  Nice Information Sir Ji…

Leave a Reply

%d bloggers like this: