दमा हा आजार नव्हे , अवस्था !

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

दमा हा आजार नव्हे , अवस्था !

एक मे . जागतिक दमा दिवस . मे महिना हा  ‘ दमा जागृती महिना ’ म्हणून ओळखला जातो , तर मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिवस म्हणून  जगभर साजरा केला जातो.
Global  Initiative for Asthma ( GINA ) या जागतिक संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन हा दिवस  १९९८ पासून साजरा केला जातो . दमा या आजाराबद्दल प्रबोधन करणे आणि दम्याने आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना याबद्दल संपूर्ण माहिती करून देणे , हा दमा दिवस साजरा करण्यामागचे प्रयोजन असते .
दमा हा एक दीर्घकालीन पण ज्यावर सहजपणे मात करता येईल , असा आजार आहे . आपल्याला जगण्यासाठी हवा , अन्न  आणि पाणी यांची नितांत गरज असते . माणूस अन्नाशिवाय काही आठवडे , पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो , पण हवेशिवाय काही मिनिटे देखील जगू शकत नाही . तर अशी ही हवा , म्हणजे त्यातील प्राणवायू आपल्या शरीरातील सर्व पेशींना  पुरविण्याचे महत्त्वाचे काम फुफ्फुसांतून सुरू होते . नाकावाटे आत घेतलेली हवा श्वसनमार्गातून पेशींपर्यंत पोहोचते . जेव्हा हे श्वसनमार्ग अरुंद होतात तेव्हा , श्वास आत घ्यायला आणि बाहेर सोडायला त्रास होतो . या अवस्थेला दमा असे म्हणतात . दमा हा आजार नव्हे तर ती केवळ एक ‘ अवस्था ’असते .  दम्याकडे पाहताना या दृष्टीने पाहिले तर , दम्यावर मात करण्याचे पहिले पाऊल जोमदार पडते . जर दमा समजून घेतला नाही आणि वेळेवर उपचार घेतले नाहीत , तर मात्र दमा हा दीर्घकाळ साथ करतो . अशा दीर्घकालीन दम्यामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो . ज्येष्ठ व्यक्तींच्या दैनंदिन गरजेच्या हालचालीवर परिणाम होतो . लहान मुलांच्या बाबतीत , त्यांच्या अभ्यासाच्या गतीवर परिणाम होतो , शाळेतील गैरहजेरी काही वेळा वाढते . त्यामुळे साहजिकच पालकांना ताण येतो . तर अशा या दम्याला समजावून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते .
दमा हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो .पण हा सर्वांनाच होत नाही . अनुवंशिकता हा दमा होण्यामागील एक महत्त्वाचे कारण असले तरी , आपल्या सभोवताली असलेल्या अनेक घटकांची आपल्याला ॲलर्जी असते आणि त्यातून दम्याचा त्रास संभवतो . दमा वाढण्याचे कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एकसारखे असत नाही . दम्याला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची एक मोठी यादी सांगता येईल . तंबाखूचा धूर , घराबाहेरील धूळ आणि धूर , परागकण , घरातील धूळ आणि धूर , धुळीतील सूक्ष्मकीटक , झुरळे , घरातील कुत्रा -मांजर -कोंबड्या यासारखे पाळीव प्राणी -पक्षी , कबुतरे , बुरशीजन्य पदार्थ , घराला  लावला  जाणारा रंग , घरातील उदबत्ती , डास पळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वड्या किंवा अगरबत्त्या , डिओडोरंट , परफ्यूमस , विविध प्रकारची अत्तरे , इतर सुगंधी पदार्थ ,रासायनिक द्रव्ये अशा वेगवेगळ्या कारणांमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो . कांही व्यक्तींना व्यायामानंतर त्रास होतो. अनेकांना विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थांची विशेषत: बाजारातील किंवा बंद डब्यातील ( प्रिझर्वेटीव्ह वापरलेले ) खाद्यपदार्थ किंवा पेये यांचा त्रास संभवतो . व्यवसायाच्या ठिकाणचे प्रदूषण हेदेखील दम्याचे एक प्रमुख कारण आहे. आपल्या डोळ्यांना न दिसणारे , दम्याचे दुर्लक्षित करण्यात आलेले कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. कोणत्याही प्रकारचा तणाव दम्याचे प्रमुख कारण असू शकते. कांही विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळे देखील दम्याचा त्रास होतो , हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
दमा कशामुळे आणि कसा होतो हे समजावून घेतले तर , दम्यावर मात करणे सोपे होऊन जाते . दम्याचा अटॅक येण्यापूर्वी अनेक व्यक्तींना घशात खवखवणे शिंका येणे , नाकातून -डोळ्यांतून पाणी येणे , तसेच छातीवर दाब आल्यासारखे वाटणे अशा तक्रारी उद्भवतात . दम्याचा अटॅक येण्याची ही पूर्वसूचना असते . अशावेळी सावधपणे आणि त्वरित उपाययोजना केली तर , दम्याच्या अटॅक पासून दूर राहता येते आणि पुढे होणारा संभाव्य त्रास आणि दगदग आपण टाळू शकतो . दमा हा आजार ओळखणे तसे अवघड नाही . धाप लागणे किंवा दम लागणे , कोरडा खोकला येणे , काही वेळा त्यातून पांढरट किंवा पिवळसर थुंकी पडणे , छातीतून घरघर किंवा सूंई  सूंई असा आवाज येणे , रात्रीच्या वेळी अचानक खोकला येऊन किंवा दम लागून उठावे लागणे आणि अर्थातच या सर्व तक्रारींमुळे दैनंदिन कामकाजावर किंवा अभ्यासावर परिणाम होणे , अशा तक्रारी दम्याच्या रुग्णांमध्ये आढळून येतात .
अशा तक्रारी आढळल्या तर , तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही प्राथमिक तपासण्या केल्या तर हा त्रास दमाच आहे किंवा नाही , यावर शिक्कामोर्तब होऊ शकते . पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची फुफ्फुसाची क्षमता तपासणारी चाचणी करून घेतली तर दम्याचे नेमके निदान होते . बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींमध्ये दमा आणि सीओपीडी  या दोन आजारांमध्ये गल्लत होते . हा आजार नेमका दमा आहे की सीओपीडी , याबद्दलची खात्री पल्मोनरी फंक्शन टेस्ट द्वारे होऊ शकते . याशिवाय  काही रुग्णांमध्ये छातीचा एक्स-रे आणि रक्ताच्या चाचण्या  करून घ्यावा लागतात . श्वसनाच्या तक्रारी नेमक्या कोणत्या आजारामुळे आहेत ? न्यूमोनियाची शक्यता आहे का ? याची काही रुग्णांमध्ये चाचपणी करावी लागते .
आज दम्यावर वेगवेगळ्या प्रकारची श्वासावाटे घ्यावयाची औषधे उपलब्ध आहेत . ती नियमितपणे घेतली तर , दम्यावर सहजरित्या मात करता येते . 
बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की , ‘आमचा दमा बरा होणार का ? ’ याचे उत्तर , ‘होय ’ असे आहे . मधुमेह , उच्चरक्तदाब यासारख्या विकारांत रक्तातील साखर किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितपणे औषधे घ्यावी लागतात . दमा असणाऱ्या व्यक्तीने आपली औषधे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर आणि दिलेल्या मात्रेनुसार घेतली तर , दमा आटोक्यात राहतो. दम्याचा अटॅक आला तर , त्यावर उपचार घेण्याबरोबरच आपला अटॅक का आणि कशामुळे आला याचा शोध रुग्णाने घ्यावा . म्हणजे भविष्यात असा अटॅक टाळण्यास मदत होऊ शकते .
एखाद्या व्यक्तीला दमा झाला असे समजले की , त्याला आपल्यावर आभाळ कोसळल्यासारखे वाटते . पण आजच्या जमान्यात दमा हा आटोक्यात येणारा आजार  आहे . मुळात दमा हा आजार नसून ती अवस्था आहे , हे पुन्हा एकदा लक्षात घेऊन दम्याला समजावून घेतले तर, दम्यावर मात शकतो , हे आजच्या जागतिक दमा दिवसाच्या निमित्ताने सर्वांनी समजावून घ्यावे आणि आपल्या आप्तस्वकीय किंवा मित्रमंडळी यापैकी कुणाला दम्यासारखा विकार असेल तर , त्यांना या सकारात्मक शब्दात धीर द्यावा , म्हणजे जागतिक दमा दिवस साजरा केला असे होईल .

⁃ डाॅ . अनिल मडके , सांगली

 

19 Responses

 1. rahul mali says:

  Awesome ….and very useful ..

 2. Smita patil says:

  Very nice artical

 3. Saurabh Khutale says:

  दमा COPD, Pneumonia यांवर
  अत्यंत सुलभ शब्दांमधे केलेले महत्वाचे समुपदेशन.

 4. पूर्णानंद राजाध्यक्ष says:

  खूप छान माहिती धन्यवाद

 5. Dr. Santosh Waghmode says:

  Precise description sir …
  # state not disease ….

 6. Ningappa Narvekar says:

  Gm Sir……Very informative article. Many Thanks Sir.

 7. WILSON DARA says:

  Dear Sir,
  Thank You for Sharing This Very Informative Article on Asthma.
  Will Share The Link With All My Relatives & Friends.

 8. Anand Chivate says:

  Nice Guidance Sir…

Leave a Reply

%d bloggers like this: