वाढते अपघात टाळण्यासाठी..

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

वाढते अपघात टाळण्यासाठी..

गेल्या कांही दिवसात रस्त्यावरील अपघातांची संख्या उन्हाळ्यातल्या तपमानाच्या पाऱ्यासारखी भराभर वाढू लागली आहे . वर्तमानपत्र उघडा , टीव्ही बघा , व्हॉट्स अप मधील मेसेज वाचा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील कोणताही न्यूज चॅनेल सर्च करा . तुम्हाला एक तरी अपघाताची बातमी दिसते. अलीकडे तर आपल्या देशात एका मागोमाग एक भीषण अशा अपघातांची मालिकाच सुरू असल्याचे चित्र दिसते . परवाच उत्तर प्रदेशमध्ये शाळेची बस रेल्वे रुळावरून जाताना रेल्वेने धडक दिल्याने १३ विद्यार्थी जागीच ठार झाले , अनेक जण जखमी झाले . याचे कारण होते , ड्रायव्हरच्या  कानातील हेडफोन . हेडफोनवर संगीत ऐकण्यात मग्न असल्याने गार्ड नसलेल्या रेल्वे रुळावरून बस घेऊन जाताना रेल्वेची शिट्टी त्याच्या कानी पडली नाही . 

कार ,मोटरसायकल , टेम्पो , ट्रक्स , कंटेनर किंवा कोणतेही दुचाकी किंवा चारचाकी वाहन अपघातासाठीव वर्ज्य नाही . कोणताही रस्ता किंवा कुठले ठिकाण वर्ज्य नाही . अपघात होतच आहेत . बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे . जोपर्यंत अशा अपघातात आपले कोणी सापडत नाही , तोपर्यंत त्याच्या झळा  आपल्यापर्यंत पोहोचणारच नाहीत का ? आपण यातून काही बोध घेणार आहोत की नाही ? ही अपघातांची , बळींची आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी कोणतीच पावले उचलणार नाही आहोत का ? कायद्यात रस्ते वाहतूक सुरक्षेसाठी अनेक योजना असताना , त्यातील कशाचाच विचार आपण करणार नाही का ? एखादे वाहन रस्त्यावरून चालवायचे कसे , याबद्दल काही शास्त्रीय नियम असतात . कायदेशीर बंधने देखील असतात . पण आजकाल रस्त्यावरून चालताना किंवा रस्त्यावरून वाहन चालवताना आजूबाजूला नजर टाकता याचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो .परदेशात गेल्यानंतर रस्त्यावर कसे चालावे , रस्त्यावरून वाहने कशी चालवावीत , शिस्त कशी असावी , कायदा म्हणजे काय असतो  याचा प्रत्यय येतो . पण मायदेशी परतल्यानंतर पुन्हा ते चित्र तिथेच विरून जाते आणि आपण अत्यंत विस्कळीतपणे जीवन जगत असल्याचा अनुभव  आपल्याला पुन्हा येतो . 

परदेशात माणसाच्या जगण्याला अत्यंत मोठी किंमत असते – आहे . तिथे माणसाच्याच नव्हे तर कोणत्याही प्राण्याच्या किंवा पक्षाच्या जीवाची किंमत सर्वांनाच आहे , त्यामुळे प्रत्येक जीवाच्या म्हणजे अगदी झाडाझुडुपांच्यासुद्धा जीवाच्या सुरक्षेची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली जाते .  भारतात मात्र यातले काहीच घडताना दिसत नाही , हे आपले दुर्दैव . हे असे का याचा शोध घेतला तर , भरमसाठ लोकसंख्या हे त्याचे पहिले कारण . त्यापुढचे कारण म्हणजे या भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येला कोणत्याही प्रकारची शिस्त नसणे . रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करता आपल्या देशातील लोकांना  ‘ट्रॅफिक सेन्स ‘ नाही असे खेदाने म्हणावे लागेल .मागे एकदा  सर्वात उद्धट लोकांचे शहर कोणते याची आजमावली केल्यानंतर त्यात मुंबईचा पहिला नंबर आला होता . एकंदरच मग्रुरी- उद्धटपणा -मस्ती- माज  मस्ती वगैरे मराठीत झणझणीतपणा दाखवण्यासाठी वापरले जाणारे शब्द केवळ कागदावर दिसत नाहीत तर , इथे रस्त्यावर क्षणोक्षणी ते अनुभवायला येतात आणि दिवसागणिक या अनुभवांची संख्या वाढत चालली आहे , हे सर्वांचेच दुर्दैव . रस्त्यावरील अपघात टाळायचे असतील तर वाहतुकीचे नियम अधिक कडक करायला हवेत आणि अर्थातच कडक  अंमलबजावणी याचा अर्थ कडक शिक्षा – तीदेखील तातडीने झाली तर वाहनांच्या वेगाला आणि अपघाताच्या संख्येला जरब बसेल यात शंका नाही . समाजप्रबोधनाने हा प्रश्न सुटेल अशी भाबडी आशा ठेवण्याचे आता दिवस उरले नाहीत असे खेदाने म्हणावे लागेल . आपल्या देशातील लोकांना , आपल्या समाजाला एखादी गोष्ट कडक कायदा केल्याशिवाय समजत नाही हा आजवरचा अनुभव आहे . मग ती नोटबंदी असो किंवा जीएसटीचा कायदा असो . एवढेच कशाला  गेल्या महिन्यातील देशभरात घडलेल्या स्त्रियांवरील वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायामुळे आणि त्यातील सर्वात ठळक म्हणजे काश्मीर मधील कठुआ प्रकरणात एका मंदिराच्या परिसरात मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे सर्वोच्च न्यायालयास वेगळा कायदा करावा लागला. बारा वर्षाच्या आतील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी असा नवा निर्णय झाला. हा निर्णय करण्याचे कारणच मुळी आपल्या समाजाची मानसिकता ! 

आज भारतात रस्त्यावर होणारे अपघात हे जगातील सर्वाधिक अपघात आहेत. अलीकडच्या आकडेवारीनुसार आज आपल्या देशात रस्त्यावरील अपघातात वर्षभर सुमारे दोन लाख लोक मृत्युमुखी पडतात. जखमींची संख्या याहून अधिक आहे. जगभरात सर्व देशांत मिळून वर्षभरातील अपघातातील मृत्यूंची संख्या जितकी असते त्यातील दहा टक्के  लोक भारतातील असतात. चीन भारतापेक्षा लोकसंख्येने मोठा असूनदेखील चीनच्या रस्त्यावरील अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या आपल्या देशातील संख्येपेक्षा खूप कमी आहे. रस्त्यावरील अपघातात मरण पावणाऱ्या व्यक्तींमध्ये १५ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचा भरणा अधिक असतो. याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे १५ ते २९ या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण ‘रस्त्यावरील अपघात’ हे आहे. हे सारे वास्तव आपण कधी समजावून घेणार आहोत ? कारण रस्त्यावर अपघात झाल्यानंतर त्यात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही घरातील कमावती व्यक्ती असू शकते. ती कदाचित घरातील एकमेव कमावती व्यक्ती असू शकते. त्या व्यक्तीचा विवाह झालेला असेल  तर , त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि लहान मुले यांच्यावर आभाळ कोसळते. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. अशा अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्ती या विद्यार्थी,  वरिष्ठ अधिकारी, कौशल्याचे काम करणाऱ्या व्यक्ती, इंजिनीयर, डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती असतात. ध्यानीमनी नसताना अशा व्यक्ती अकाली मृत्यूमुखी पडणे ही राष्ट्रीय हानी आहे, हे आपण सर्वानी लक्षात घ्यायला हवे. यासाठीच रस्त्यावरील अपघात कमी होण्याच्या दृष्टीने कडक कायदे होण्यासाठी आपण आग्रह धरायला हवा. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची वेगवेगळी कारणे पाहिली तर, त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वाहन चालक. कोणताही अपघात विनाकारण होत नाही. कोणताही अपघात होण्यामागे मानवी चूक असते.

स्त्यावरील अपघात हे चालवणार्‍यांच्या चुकीमुळे होतात. याची वेगवेगळी कारणे आहेत. गाडी चालकाची मानसिकता, त्याचा ताणतणाव, त्याचे व्यसन- मद्यपान,  त्याची अपुरी झोप, वाहनाचा वेग. यातील वाहनचालकाची मानसिकता ही बाब अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याकडे रस्त्यावरून वाहन चालवताना कुठल्यातरी स्पर्धेत भाग घ्यावा अशा वेगाने वाहने हाकली जातात मागून येणाऱ्या वाहनाने ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न दिला तर अनेकांना राग येतो. जणू त्यांच्या स्वत्वाला धक्का बसतो. त्यातून वाहनांचे वेग वाढतात. मागून येणाऱ्या वाहनाला सहजासहजी बाजू द्यायची नाही अनेकदा घडते. ही मानसिकता बदलायला हवी. यामुळे अनेकांचे जीव हकनाक जातात. दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे आणि हेल्मेटचे हनुवटीवरील बेल्ट लावणे हे महत्त्वाचे असते. चारचाकी वाहनात सीटबेल्ट लावणे सुरक्षेचा दृष्टीने महत्वाचे असते. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे हे जीवावर उदार होण्याची गोष्ट आहे. वाहन चालवताना कानाला हेडफोन लावून किंवा न लावता संगीत ऐकणे किंवा मोठ्याने आवाज करत मोठ्याने आवाज असलेले संगीत ऐकणे हे धोक्याचे ठरते. 

या सर्वांबरोबरच महत्त्वाचे असतात ते वाहतुकीचे नियम. वाहतुकीचे म्हणून काही वेगळे नियम असतात आणि ते पाळावयाचे असतात हे अनेकांना माहित आहे की नाही कुणास ठाऊक ! त्यांना हे माहीत करून देणे ही काळाची गरज आहे, एवढेच नव्हे तर अकाली काळ येऊ नये यासाठी ही आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी बाजारातून एखादे खेळणे घरी आणले की ते सर्वांकडून गांभीर्याने हाताळले जाई. ज्या लहानग्यासाठी ते खेळणे आणलेले असे त्यालाही पालक ते खेळणे नीट हाताळत खेळण्याबद्दल सारे सांगितले जाई. आजकाल आपल्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन म्हणजे तरुण मंडळीना खेळणे वाटते. हे खेळणे देखील ज्या गांभीर्याने हाताळायला हवे. त्या गांभीर्याने ते हाताळले जात नाही, नीट वापरले जात नाही. रस्त्यावरील अपघात टाळण्याच्या दृष्टीने वाहन चालकांना परवाना (लायसेन्स) देतानाचे कायदे अधिक कडक करायला हवेत आणि त्यांची अंमलबजावणी तेवढ्याच कडकपणे करायला हवी. असे परवाने देण्यापूर्वी वाहनचालकांना वाहन चालवण्याचे शास्त्रशुद्ध दीर्घकालीन प्रशिक्षण द्यायला हवे आणि वाहतुकिचा नियमांची त्यांच्याकडून घोकंपट्टी करून घ्यायला हवी. रस्त्यावरील वाहतुकीचे नियम आणि कायदे हे कडकच करायला हवेत.

दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन घराबाहेर पडत असताना आपण परमेश्वराचे स्मरण करावे. केवळ परमेश्वराचे स्मरण करून चालणार नाही तर त्याचवेळी वाहतुकीच्या नियमांचेसुद्धा स्मरण करावे हे. मी या नियमांचे नीट पालन करेन अशी भावना परमेश्वर चरणी व्यक्त करावी म्हणजे आजच्या ह्या वातावरणात आपण सुरक्षितपणे घरी परत येऊ असे म्हणता येईल. आपले वाहन सुस्थितीत आहे की नाही याची नियमितपणे चाचपणी करावी. लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाताना तर ती हमखास करावी, विशेषतः टायरमधील हवा / प्रेशर आणि ब्रेक यांची उत्तम स्थिती तपासून घ्यावी. सीट बेल्ट लावल्याशिवाय एअरबॅग्स काम करत नाहीत हे अनेकांच्या लक्षात नसते, त्यामुळे सीट बेल्ट लावणे महत्त्वाचे. सलग दोन तास प्रवास केल्यानंतर थोडी विश्रांती घेणे गरजेचे असते. चालकाने आधीच्या रात्री पुरेशी झोप घेतली की नाही याची, दीर्घ प्रवासाला जाताना इतर प्रवाशांनी खातरजमा करून घ्यावी. मद्यपान हे चालकासाठी लांगूलचालन किंवा ओळखीचा, नात्यातला, मित्रापैकीच एक आहे म्हणून डोळेझाक करण्याची गोष्ट नाही. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा. हायवेवर विनाकारण कुठेही थांबू नये. अपघात टाळण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी . 

मित्रांनो , वेळीच सावध व्हा ! काळजी घ्या !!

⁃ डाॅ . अनिल मडके , सांगली

2 Responses

  1. Smita patil says:

    कायदे कडक हवेतच.पण आपण कधी बदलणार.कायदा किंवा शिक्षेशिवाय बदल नाही ही आपली मानसिकता केव्हा बदलणार.? चांगल्या गोष्टी स्विकारण्याची सवय लावून घेवूयात…..लेख छान आहे.त्या पाठीमागची तळमळ सर्वजण समजून घेवूया.असेच वाचणीय लेख आम्हांस वाचण्यास मिळोत ही सदिच्छा.

  2. Pranav says:

    हॉर्न पासून सगळ्या सवयी बदलायला हवेत

    सुंदर ब्लॉग

Leave a Reply

%d bloggers like this: