वायुप्रदूषणामुळे होऊ शकतो हृदयविकार !

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

वायुप्रदूषणामुळे होऊ शकतो हृदयविकार !

अपघात, आंदोलन, बंद, मोर्चे, लाचखोरी, फसवाफसवी इत्यादी बातम्यांसारख्याच वायुप्रदूषणाच्या बातम्याही हल्ली नित्याच्या होऊ पाहत आहेत. कांही दिवसापूर्वी उत्तरेतील धुळीच्या वादळाची बातमी आली. दिल्ली, लखनौ, फैजाबाद, सीतापूर, कानपूर आदी भागांत धुळीच्या वादळाने थैमान घातले. दिल्लीतले प्रदूषण प्रचंड वाढले. हवेत धुळीच्या कणांची मात्रा अठरा पट वाढली. किमान तपमान वाढले. एक आठवडाभर बांधकामे थांबविण्याच्या सूचना दिल्ली प्रशासनाने दिल्या. एवढेच नव्हे तर धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारण्यात आले.

जगभरात प्रदूषण वाढत आहे, पण भारतात त्याचे प्रमाण अधिक आहे. लोकसंख्यावाढ आणि त्या प्रमाणात वाहनांची वाढ हे त्याला कारणीभूत घटक. पुण्यात तर वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षा अधिक आढळली. जगातल्या अत्यंत वायुप्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील नऊ शहरे असल्याची अलीकडची बातमी आहे. यावरून काय तो बोध घ्यावा आणि आपल्या आरोग्याचा शोध घ्यावा.

आरोग्याचा शोध घ्यावा म्हणण्याचे कारण असे की, वायुप्रदूषणामुळे श्‍वसनाचे विविध रोग जडतात आणि ते बळावतात हे सर्वांना ठाऊकच आहे. यात दमा, सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीज), श्‍वासनलिकांचा दीर्घकालीन दाह (क्रोनिक ब्राँकायटीस ) आणि आय. एल. डी. (इंटरस्टिशियल लंग डिसीज) असे विकार उद्भवतात. हवेतील सल्फर डायॉक्साईड, कार्बन-डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स, कार्बन मोमॉक्साईड, ओझोन आणि हवेत मिसळणारे अनेक प्रकारचे सूक्ष्म कण हे आपल्या आरोग्यास घातक असतात. आपल्या फुप्फुसातील पेशी निकामी होणे, फुप्फुसांची jकार्यक्षमता कमी होणे आणि दीर्घकालीन फुप्फुसविकार जडणे हे वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचे परिपाक असतात. पण गेल्या काही वर्षांतील अभ्यासगटांच्या निरीक्षणानुसार हेच वायुप्रदूषण हृदयविकारासाठी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

आरोग्यास घातक असलेले हवेतील हे कण १० मायक्रॉनहून कमी आकाराचे असतात. त्यांच्या आकारमानानुसार त्यांचे तीन गट करता येतात. १० ते २.५ मायक्रॉन म्हणजे सूक्ष्म कण, २.५ ते ०.१ मायक्रॉन म्हणजे अतिसूक्ष्म कण आणि ०.१ मायक्रॉनपेक्षाही लहान म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म कण. यांतील तिसर्‍या गटातील म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म कणांचा परिणाम शरीरावर किती होतो , याचा इतका अभ्यास झाला नव्हता. डडिनबर्ग आणि नेदरलँड विद्यापीठांत केल्या गेलेल्या अभ्यासात १४ व्यक्तींना सलग दोन तास सूक्ष्मातिसूक्ष्म असे रासायनिक प्रक्रियेत भाग घेऊ न शकणारे कण ( Inert Gold Particles )असलेल्या वातावरणात श्‍वसन करू दिले. या सूक्ष्म कणांनी केवळ फुप्फुसात नव्हे, तर रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश केल्याचे दुसर्‍या दिवशी आढळले. बरेच कण शरीरात काही महिने वास्तव्य करून होते , असे दिसून आले.

वायुप्रदूषणात असलेले अनेक घटक विशेषतः डिझेल इंजिनमुळे होणार्‍या प्रदूषणातून निघालेले घटक रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांचा दाह होतो. या घटकांमुळे रक्त पातळ राहण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी रक्तात गुठळी होण्याची शक्यता वाढते. रक्तवाहिन्यांची सोनोग्राफी ( Intravascular Ultrasound Doppler ) केल्यानंतर हे लक्षात आले.

रक्तवाहिन्यांच्या आतील स्तराचा दाह होणे , रक्तप्रवाह मंदावणे, त्या जागी चरबी आणि इतर घटक साचणे, अशा क्रिया हृदयविकारामध्ये होतात. ह्रदयाची एखादी रक्तवाहिनी पूर्ण बंद झाली की , हृदयाचा, त्या भागाचा, रक्तपुरवठा बंद पडतो. यालाच हार्ट अटॅक म्हणतात. रक्तात गुठळी होऊ नये यासाठी रक्तातील काही घटक रक्त पातळ ठेवण्याचे काम सातत्याने करत असतात. वायुप्रदूषणातील घटकांमुळे रक्त पातळ राहण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.

यापुढे वायुप्रदूषणाचा विचार सर्वांनीच गांभीर्याने करायला हवा. विशेषतः ज्यांना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक आहे त्यांनी हा विचार करायलाच हवा. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा असणार्‍या व्यक्तींनी, ज्यांची जीवनशैली बैठी आहे, ज्या व्यक्ती नियमितपणे व्यायाम करीत नाहीत, ज्यांचे कोलेस्टेरॉल खूप वाढले आहे, जे तंबाखू-धूम्रपान करतात अशा सर्वांनी शुद्ध हवेचा ध्यास घ्यायला हवा , कारण अशा व्यक्तींना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते.

हृदयविकाराचे प्रमाण ग्रामीण भागापेक् शहरी भागात अधिक असण्यामागे वायुप्रदूषणाचा हात असावा असा अंदाज आहे. वायुप्रदूषण हे केवळ वाहनांमुळे होत नाही, तर विविध कारखाने, चुलीचा धूर, कचरा जाळणे अशा विविध कारणांमुळे आणि क्रियांमुळे होते. या सर्वांवर नियंत्रण यायला हवे.

‘ कॅटॅलायटिक कन्व्हर्टर ‘ वापरून वाहनांतून बाहेर पडणार्‍या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करता येते. वाहनांच्या संख्येवर बंदी घालणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करणे हा महत्त्वाचा उपाय दुर्लक्षित होत असल्याचे दिसते.

दररोज दुचाकीवरून प्रवास करणार्‍या व्यक्ती, रस्त्यावर काम करणार्‍या किंवा रस्त्याकडेला व्यवसाय करणार्‍या व्यक्ती, ट्रॅफिक पोलीस या सर्वांना वायुप्रदूषणाचा मोठा धोका असतो. त्यांनी आपल्या फुप्फुसाची कार्यक्षमता चाचणी (पल्मोनरी फंक्शन टेस्ट) नियमित करण्याबरोबर आपल्या हृदयाची चाचणीही नियमितपणे करणे शहाणपणाचे ठरणार आहे.

हृदयविकार दूर ठेवण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तो व्यायाम वाहतूक-वर्दळीच्या रस्त्यावर चालण्याचा तर नाही ना याची खात्री करा. नाहीतर व्यायामामुळे हृदय निरोगी बनण्यापेक्षा वायुप्रदूषणामुळे त्याला त्रासच होऊ शकतो.

-डाॅ . अनिल मडके , सांगली .

9 Responses

 1. Sunil says:

  Nice information sir

 2. Meghana Kulkarni says:

  माहितीपूर्ण लेख….👌👌

 3. Pranav says:

  Nice information

 4. rahul mali says:

  Very informative…

 5. Saurabh Khutale says:

  मुबलक आणि मोफत उपलब्ध असल्यामुळे प्राणवायू चि मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
  आरोग्यदायी वातावरणासाठी निसर्ग संवर्धन करणे आवश्यक आहे
  तसेच वैयक्तिक पातळीवर वेळौवेळी आरोग्य तपासणी करणे आणि योग्य डाक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
  अतिशय महत्त्वपूर्ण माहिती.

 6. Pooja Patil says:

  वायूप्रदूषण कमी करण्याचा विचार सवॉंनीच केला पाहिजे .
  अतिशय महत्वाची माहिती आहे.

 7. Anand Chivate says:

  Excellent Information Sir…

Leave a Reply

%d bloggers like this: